प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांकडून दिखाव्याची पाहणी?

उग्र वासाने वाशी मधील रहिवाशी त्रस्त

वाशी : वाशी सेक्टर-२६, कोपरी गाव परिसरात वायू प्रदूषणाचा मारा सुरुच आहे. मात्र, सदर वायूच्या उग्र वासाने येथील रहिवाशांचे जगणे असह्य झाले आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आल्यानंतर उग्र वास येत नसल्याचा पंचनामा करुन येथील रहिवाशांची बोळवण केली जाते. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी फक्त दिखाव्याची पाहणी करत असल्याचा आरोप येथील रहिवाशी करत आहेत.

धुळ आणि वायू प्रदूषणावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर नवी मुंबई महापालिकेने धुळ आणि वायू प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर  वाशी सेक्टर-२६, कोपरी गाव परिसरातील धुळ प्रदूषण काही अंशी कमी झाले होते. मात्र, येथील रासायनिक वायू प्रदूषण ‘जैसे थे' आहे. मागील तीन दिवसांपासून रासायनिक कारखान्यांमधून रात्री मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण केले जात आहे. या वायूच्या उग्र वासाने श्वास गुदमरणे, मळमळ होणे, डोळ्यात पाणी येणे, असे प्रकार घडत आहेत. वायू प्रदूषणाचा मारा इतका असतो की समोरील दहा मीटर अंतरावर काय आहे?, तेे देखील दिसत नसते. या वायू प्रदूषणाबाबत तक्रार केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी पाहणी करतात. मात्र, या पाहणीत वास येत नसल्याचा अहवाल तयार करुन येथील रहिवाशांना खोटे पाडण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप  वाशी सेक्टर-२६, कोपरी गाव परिसरातील रहिवाशी करत आहेत.

दरम्यान, नवी मुंबई मध्ये एक दिवस भोपाळ गॅस दुर्घटना प्रमाणे घटना घडून शेकडो जीव गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येईल का?, असा सवाल करत  वाशी सेक्टर-२६, कोपरी गाव परिसरातील वायू प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी प्रो. विलीन कुमार यांनी केली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे मध्ये ‘विकसित भारत संकल्प यात्रा'ला सुरुवात