दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांना पनवेल महापालिका तर्फे नोटीस

 प्रत्येक प्रभागात स्पीकरद्वारे अनाउन्समेंट

 पनवेलः महाराष्ट्र दुकाने आणि आस्थापना सुधारणा अधिनियम २०२२ मधील कलम ३६ ‘क' नुसार सर्व दुकाने, संस्था, वाणिज्य आस्थापना, निवासी हॉटेल्स, उपहारगृहे आणि खाद्यगृहे किंवा सार्वजनिक मनोरंजनाची अथवा करमणुकीची इतर ठिकाणे आदि प्रकारच्या प्रत्येक आस्थापनेचा,दुकानाचा नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेमध्ये असणे बंधनकारक आहे. त्यानुसार पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार पनवेल महापालिका हद्दीतील चारही प्रभागांमधील मराठी नामफलक नसलेल्या ११६३ दुकाने आणि आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रभागात स्पीकरद्वारे अनाउन्समेंट देखील केली जात आहे.

सर्व दुकाने आणि आस्थापनांवर मराठी नामफलक लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांची दिलेली वाढीव मुदत २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संपली. त्यामुळे मुदत संपल्यानंतरही अमराठी पाट्या न बदलणाऱ्या दुकाने आणि आस्थापनांचे महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण सुरु असून, सदर आस्थापनांना महापालिकेकडून कारवाईच्या नोटीसा बजावण्यात येत आहेत. २५ नोव्हेंबर पासून नोटीसा बजावण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, पनवेल महापालिका प्रभाग अ, ब, क, ड मधील सुमारे ११६३ दुकाने आणि आस्थापनांना आत्तापर्यंत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याकरीता २४ नोव्हेंबर रोजी महापालिका उपायुक्त गणेश शेटे यांनी सर्व प्रभाग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना दिली होती.

पनवेल महापालिका क्षेत्रातील अनेक दुकाने आणि आस्थापनांवरील नामफलक फक्त इंग्रजी आणि अन्य भाषेत आहेत. काही फलकांवर नावे मराठी भाषेत लिहीलेली जरी असली तरीही ती औपचारीकता म्हणून कोपऱ्यात लहान अक्षरात लिहीलेली आहेत. नियमाप्रमाणे दुकाने किंवा आस्थापनांवरील नामफलक ठळक मराठी (देवनागरी) लिपीत तर असावाच त्याचप्रमाणे इतर कोणत्याही भाषेपेक्षा लहान नसावा असे नमूद आहे. त्यामुळे दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांना महापालिका प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत  कारवाईची नोटीस बजावण्यात आली असून, यापुढेही नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरुच राहणार आहे, असे महापालिका उपायुक्त गणेश शेटे यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस १५० वर्ष