सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस १५० वर्ष

ठाण्यात सत्यशोधक दिंडीचे आयोजन 
 
ठाणे : महात्मा जोतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस २०२३ मध्ये १५० वर्षे पूर्ण होत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी महात्मा जोतिबा फुले स्मृती दिन आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक दिंडी काढण्यात आली. ठाणे शहर व जिल्ह्यात तसेच मुंबई आणि नवी मुंबईतील विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या सामाजिक संस्था, महिला व कामगार संघटनांच्या पदाधिकारी आणि नेत्यांनी सहभाग घेतला. 
 
महात्मा जोतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ ठाण्यात सत्यशोधक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत खा. सुप्रिया सुळे , मा. खा. हरिभाऊ राठोड, ॠता आव्हाड, सुहास देसाई, जितेंद्रकुमार इंदिसे , केदार दिघे, डॉ. आनंद तेलतुंबडे, उर्मिला पवार, अर्जुन डांगळे, महेश केळुसकर , सुधाकर यादव , एम. ए. पाटील, डाॅ संजय मंगला गोपाळ, अतुल गोरे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होते. ठाणे शहर व जिल्ह्यात तसेच मुंबई आणि नवी मुंबईतील विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या सामाजिक संस्था, महिला व कामगार संघटनांच्या वतीने डाॅ. प्रज्ञा दया पवार,  जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, मुक्ता श्रीवास्तव, निर्मला पवार, संजय भालेराव आदींनी पुढाकार घेऊन '"सत्यशोधक विचार संवर्धन समिती, ठाणे" स्थापन करून भगवती मैदान (विष्णूनगर, नौपाडा) ते कॉ. गोदुताई परुळेकर उद्यान (गणेशवाडी, ठाणे महानगरपालिकेजवळ) अशी दिंडी काढण्यात आली. दिंडीत सहभागी सत्यशोधकांनी हातामध्ये सामाजिक लढ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, प्रबोधनकार ठाकरे, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आदी अग्रणींची छायाचित्रे, तसेच त्यांचे विचार दर्शवणारे फलक हाती घेतले होते.  
 
सत्यशोधक दिंडीचा समारोप गोदूताई परुळेकर उद्यानात करण्यात आला. सुरुवातीला अनुबंध, भारतीय महिला फेडरेशन, समता विचार प्रसारक संस्था, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, परिसर सखी मंडळ आदी संस्थांनी गीते, पथनाट्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तर समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेत्या कॉ. मुक्ता मनोहर होत्या आणि सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष के. इ. हरिदास हे प्रमुख पाहुणे होते.  त्यांनी मुक्ता मनोहर आणि अब्दुल कादर मुकादम यांचा फुले पगडी देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ आणि वृषाली विनायक यांनी केले तर आभार प्रदर्शन समितीच्या वतीने जगदीश खैरालिया यांनी केले.
 
 
 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मी शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले, आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी तुमची