सानपाडा येथील हुतात्मा बाबू गेनु सैद मैदानाची दुरवस्था

मुलांना मैदानात खेळण्यास मनाई?

तुर्भे : नवी मुंबई महापालिकेच्या सानपाडा येथील हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानाची अत्यंत दुरवस्था झाली असून, याप्रकरणी स्थानिक खेळाडूंनी महापालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला आहे.

सानपाडा परिसरामध्ये चांगल्या प्रकारे खेळाची मैदाने तसेच उद्याने उपलब्ध आहेत. परंतु, या मैदानांच्या देखभाल दुरुस्ती अभावी त्यांना बकालपण आले आहे. याचाच एक उत्तम नमुना म्हणून हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानामध्ये विविध राजकीय पक्ष आणि संस्था यांचे सामाजिक कार्यक्रम झाल्यानंतर मैदानात खड्डे, डेब्रिज इतरत्र पडलेले आढळून येते. याबाबत महापालिका तुर्भे विभाग कार्यालयाच्या माध्यमातून राजकीय दबावामुळे कोणत्याही प्रकारे संबंधित संस्थांवर कारवाई केली जात नाही. तसेच हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानाच्या आजूबाजूला असलेल्या सोसायटी मधील रहिवाशी या मैदानामध्ये त्यांच्या गाड्या पार्क करत असतात. या गाड्या दिवसभर आणि रात्रीही हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानात उभ्या करण्यात येत असल्याने गाड्यांचे नुकसान होऊ नये यासाठी मुलांना या मैदानात खेळण्यास मनाई केली जात आहे. यामुळे लहानग्यांच्या आनंदावर विरजण पडत आहे. परंतु, याचे कसलेही सोयरसुतक महापालिका प्रशासनाला नाही. याशिवाय याच मैदानामध्ये एक अतिक्रमित पोलीस ठाणे आहे. या सानपाडा पोलीस ठाणे पाठीमागील बाजूस मोठ्या प्रमाणावर गुन्ह्यात सापडलेल्या गाड्या बेवारस स्थितीमध्ये धुळखात पडून आहेत.

हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानात नियमितपणे स्वच्छता केली जात नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आढळून येत आहेत. हुतात्मा बाबू गेनू सैद मैदानाच्या चारही बाजूंना जॉगिंग ट्रॅक करण्यात आला आहे. परंतु, त्याचीही दुरवस्था झाली आहे. नियमितपणे साफसफाई नसल्याने या ट्रॅकवर पुष्कळ प्रमाणात कचरा साचला आहे. मैदानाच्या पूर्वेकडील बाजुला सुरक्षा भिंत बांधण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. परंतु, अनेक दिवस सुरक्षा भिंत बांधण्याचे काम अर्धवट स्थितीत पडून असल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. याप्रकरणी महापालिका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून अतिक्रमणमुक्त हुतात्मा बाबू गेनू सैद मैदान मुलांना खेळण्यास उपलब्ध करावे, अशी मागणी स्थानिकंकडून केली जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्यांना पनवेल महापालिका तर्फे नोटीस