एमआयडीसी परिसरात धुळीचे लोट कायम

उच्च न्यायालयाच्या निर्देशांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष?

वाशी : मुंबई परिसरात वाढत्या धुळ प्रदूषणाची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने स्वतः हून सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिकांनी, वाहतूक पोलिसांनी धुळ प्रदूषण रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, एमआयडीसी प्राधिकरणाने मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने आजही नवी मुंबई मधील एमआयडीसी परिसरात धुळीचे लोट उडत आहेत.

धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कडक पाऊले उचलत विविध उपाययोजना आखत त्यांची अंमलबजावणी महापालिका क्षेत्रात प्रभावीपणे करण्याचे सवत निर्देश दिले आहेत. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांकडे एमआयडीसी प्राधिकरणाने सपशेल दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे.

नवी मुंबई मधील एमआयडीसी क्षेत्रातील महापे ए ब्लॉक, खैरणे, इलेक्ट्रॉनिक झोन महापे परिसरात रस्ता काँक्रिटीकरण, सीईटीपी वाहिनी तसेच नवीन इमारती बांधण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे एमआयडीसीतील रस्त्यांवर सध्या धुळीचे लोट उडताना दिसत आहेत.

मात्र, सदर धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून रस्त्यांवर पाणी, फवारे किंवा धूळ प्रतिबंधासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरीकांना तोंड दाबून रस्त्याने चालावे लागत आहे. याबाबत एमआयडीसी महापे कार्यालयाचे कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.

धूळ नियंत्रणासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. त्यामुळे एमआयडीसी प्राधिकरण धूळ नियंत्रणाकडे दुर्लक्ष करीत असेल तर त्यांना धूळ प्रदूषणावर उचित कार्यवाही करण्यासाठी पत्र लिहून सूचना देण्यात येतील. - जयंत कदम, उप प्रादेशिक अधिकारी - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई. 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राज्य सहकारी गृह निर्माण संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी सुहास पटवर्धन