सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणा-या ५ डंपर सहित ९ इसमावर कारवाई

एनआरआय सागरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल  

नवी मुंबई : सिडकोने संपादित केलेल्या जमीनीवर व भूखंडावर तसेच नवी मुंबई  अनधिकृतपणे डेब्रीज टाकण्याचे प्रकार वाढत आहेत. तसेच सदरचे डेब्रीज हे मानवी आरोग्य धोकादायक व पर्यावरणास हानिकारक असल्याने टाकण्यात येणाऱ्या अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्यासाठी सिडको प्रशासनाने कंबर कसली आहे.  त्यानुसार गुरुवारी उलवे येथील साईबाबा मंदिरासमोर रात्रीच्या सुमारास सिडकोच्या मोकळ्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकत असताना सिडकोच्या पथकाने ५ डंपर्ससहित त्यावरील चालक आणि क्लीनर असे एकूण ९ इसमांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्यावर एनआरआय सागरी पोलिस स्थानकात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

दरम्यान, सिडकोच्या दक्षताविभागाद्वारे सिडको कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृतपणे डेब्रिज टाकणा-यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिम सुरु असताना उलवे येथील साईबाबा मंदिरासमोर, उलवे रोड येथे डेब्रीजने भरलेले   डंपर्स मध्यरात्रीच्या सुमारास खाली करत असल्याची माहिती सिडकोच्या पथकाला मिळाल्यानंतर सिडकोने मुख्य दक्षता अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सिडकोतील, मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे विभागाचे अधिकारी, पोलस, तसेच सुरक्षा रक्षक यांच्यामार्फत धडक मोहिम राबविण्यात आली.  

यावेळी ५ डंपर्समधून सदर ठिकाणी डेब्रीज टाकण्यात येत असल्याने  5 डंपर्स सहित बाबू चांद तांबोळी, महेशकुमार महातो, अभयकुमार चौधरी, तुफानी चौहान, फेजाय मेहबुब जमादार, सुनील कांबळे, सुनिल गायकवाड, दिलीप राय, बादल महातो, या डंपर चालक व क्लिनर यांच्या विरुध्द एनआरआय सागरी पोलिस स्टेशनमध्ये शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.  

दरम्यान, सिडको कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृतपणे डेब्रीज टाकत असताना कोणी आढळल्यास सिडकोच्या www.cidco.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तसेच संबंधित पोलिस ठाण्यात कळविण्यात यावे असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.    

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महाआवास अभियान राज्यस्तरीय कार्यशाळा शुभारंभ, पुरस्कार वितरण सोहळा संपन्न