महाआवास अभियान राज्यस्तरीय कार्यशाळा शुभारंभ, पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

राज्यपुरस्कृत योजनेत कोकण विभाग ‘प्रथम' क्रमांक

ठाणे : मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण सभागृहात महाआवास अभियान २०२३-२४ राज्यस्तरीय कार्यशाळा शुभारंभ आणि सन २०२१-२२ या वर्षीच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचे २३ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी सन २०२१-२२ या वर्षीचा महाआवास अभियान पुरस्कार विभागातून राज्यपुरस्कृत योजनेत कोकण विभागाने प्रथम क्रमांक पटकाविला.राज्याचे  ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते सदर पुरस्कार कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी स्वीकारला.

यावेळी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजनेत (ग्रामीण) सर्वोत्कृष्ट विभाग प्रथम नागपूर, द्वितीय नाशिक, तृतीय पुणे, राज्यपुरस्कृत योजनेत कोकण प्रथम, नागपूर द्वितीय, पुणे विभाग तृतीय क्रमांक असे विजेते घोषित करण्यात आले. तसेच महाआवास अभियानातील विविध घटकांसाठी सर्वोत्कृष्ठ जिल्ह्यांनाही विशेष पुरस्कार देण्यात आले.

ना. गिरीष महाजन यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना पुरस्कार वितरण संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ग्रामसडक योजनेचे सचिव के. पी. पाटील, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, राज्य व्यवस्थापन कक्ष संचालक डॉ. राजाराम दिघे आदी मान्यवर उपस्थित होते.

गरीब, समाजाच्या शेवटच्या घटकातील व्यक्तीचे स्वतःचे घरकुल असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन  अनेक घरकुल योजना राबविते. या योजनांच्या समन्वयातून राज्य शासनाने महाआवास अभियानाचा शुभारंभ केला आहे. महाआवास अभियानाच्या अंमलबजावणीतून लाभार्थ्याच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यात येणार आहे.
महाआवास अभियान २० नोव्हेंबर पासून सुरु झाले असून, येत्या ३१ मार्च २०२४ पर्यंत महाआवास अभियान राबविण्यात येणार आहे. जागा नसलेल्या कुटूंबांना घरकुले देण्यामध्ये महाराष्ट्र राज्याची कामगिरी देशात अव्वल आहे. या अभियानाच्या माध्यमातून बांधकाम अपूर्ण असलेली, मंजूर असलेली मात्र बांधकाम सुरु नसलेली घरकुले लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत, असे यावेळी ना. गिरीष महाजन यांनी सांगितले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 वाशी मध्ये १ ते ४ डिसेंबर दरम्यान मालमत्ता प्रदर्शन