धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

एपीएमसी धान्य बाजारात छताचा भाग कोसळला; २ कामगार जखमी

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती धान्य बाजारातील वाय गल्लीत सज्जा/छताचा काही भाग पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे  मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारात पाच बाजार आवार आहेत. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील सर्व इमारतींची निर्मिती सिडको मार्फत करण्यात आली आहे. मात्र, अल्पावधीतच मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील इमारती धोकादायक झाल्या आहेत. यातील कांदा-बटाटा बाजार मधील संपूर्ण इमारती अती धोकादायक घोषित करण्यात आल्या असून, धान्य बाजारात देखील काही इमारती धोकादायक आहेत. त्यामुळे धोकादायक इमारतीच्या छताचे प्लास्टर पडण्याच्या घटना येथे नित्याने घडत आहेत. मागील दोन-तीन महिन्यांपूर्वी अनुक्रमे कांदा-बटाटा मार्केट आणि फळ मार्केट मध्ये स्लॅब पडण्याच्या घटना घडल्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी एपीएमसी धान्य बाजारात पुन्हा एकदा स्लॅब पडण्याची घटना घडली आहे. एपीएमसी धान्य बाजारातील वाय गल्लीत एक ट्रक धक्क्यावर माल भरत असताना अचानक छताचा स्लॅब येथील कामगारांच्या अंगावर पडला. या घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एक कामगाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, तीस टाके पडले आहेत आणि चार ठिकाणी फेकचर आहेत. तर एक जणाच्या डोक्याला जबर मार बसला आहे.

वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारात धोकादायक इमारतीच्या छताचे प्लास्टर पडण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवाय बाजार समिती घटकांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला आहे. 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रहदारीच्या रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता