एपीएमसी शौचालय घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित

तब्बल सात कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केटमध्ये झालेल्या शौचालय घोटाळा प्रकरणी नवी मुंबई  पोलिसांपाठोपाठ आता बाजार समिती प्रशासन देखील सतर्क झाले आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील तीन अधिकाऱ्यांना एपीएमसी  सचिवांनी निलंबित केले आहे. उपअभियंता दर्शन भोजनकर, उप सचिव विजय शिंगाडे आणि कार्यालय विलास पवार अशी निलंबित केलेल्या एपीएमसी अधिकाऱ्यांची नावे आहेत.

वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय कंत्राटात मोठा घोटाळा झाला असल्याचे फेर चौकशीत निष्पन्न झाले आहे. तब्बल सात कोटी रुपयांचा शौचालय घोटाळा उघडकीस आला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पाटार्ी'च्या वजनदार नेत्यांसह निवृत्त अधिकारी आणि सध्या कार्यरत एपीएमसी अधिकाऱ्यांच्या विरोधात शासनाच्या निर्देशानंतर सदर तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर ‘बाजार समिती'च्या आजी-माजी अधिकाऱ्यांसह एकूण ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास नवी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहे. या तपासाला आता गती आली असून, या घोटाळ्यात सुरेश मारु आणि मनीष पाटील या  आणखी दोन जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तर नवी मुंबई पोलिसांच्या कारवाई नंतर आता ‘बाजार समिती'चे सचिव पी. एल. खडांगले देखील सतर्क झाले असून, त्यांनी देखील कारवाईचा बडगा उगारला आहे.

एपीएमसी शौचालय घोटाळ्यात गुन्हा दाखल असलेल्यांपैकी एपीएमसी उपअभियंता दर्शन भोजनकर, उप सचिव विजय शिंगाडे आणि कार्यालय विलास पवार या तीन अधिकाऱ्यांना २१ नोव्हेंबर रोजी ‘बाजार समिती'चे सचिव पी. एल. खडांगले यांनी निलंबित  केले आहे. तसेच यापुढे बाजार समितीत कामचुकार करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही, अशा इशारा देखील ‘बाजार समिती'चे सचिव पी. एल. खडांगले यांनी आयोजित बैठकीत दिला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर