गावांना प्रवेशद्वार; शहराचे कधी?
नवी मुंबई शहराच्या प्रस्तावित प्रवेशद्वारांचा प्रस्ताव धूळखात?
वाशी : नवी मुंबई शहरातील गावांची ओळख सर्वांना व्हावी, याकरिता नवी मुंबई शहराच्या हद्दीवर प्रवेशद्वार बनविण्यात यावे, या मागणीच्या प्रस्तावाला २०१९ मध्ये नवी मुंबई महापालिका स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली होती. मात्र, मागील चार वर्षांपासून या प्रस्तावाला कुठलीच गती मिळाली नसल्याने सदर प्रस्ताव धूळखात पडला आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराची ओळख दर्शवणारे प्रवेशद्वार कधी उभारले जातील?, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
१९७० साली ‘सिडको'च्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांची जमीन संपादित करुन नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर १९९२ मध्ये नवी मुंबई महापालिकेची स्थापना होऊन आज ३१ वर्षाचा कालावधी उलटला आहे. महापालिकेने नवी मुंबई शहरात महापालिका मुख्यालयासहित विविध वास्तू उभारुन अनेक स्थापत्य विषयक कामे केली आहेत. मात्र, मागील कित्येक वर्षापासून नवी मुंबई शहराची ओळख दर्शविणाऱ्या प्रवेशद्वारांचा प्रस्ताव मात्र रेंगाळत पडला आहे. नवी मुंबई महापालिकेने नवी मुंबई शहरातील गावांची ओळख दर्शवण्यासाठी प्रत्येक गावाला प्रवेश द्वार बनवावे, असा प्रस्ताव महापालिका स्थायी समिती बैठकीत २०१९ साली आला होता. त्याच वेळी नवी मुंबई शहराची ओळख दर्शविण्यासाठी प्रवेशद्वार बनवावें अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर तत्कालीन महापालिका अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी सहमती दर्शवली होती. मात्र, त्यानंतर या प्रस्तावाला कुलीच चालना न मिळाल्याने नवी मुंबई शहराचे प्रवेशद्वार अजूनही उभे राहिले नाही. परंतु, नवी मुंबई शहरातील गावांची ओळख दर्शवण्यासाठी महापालिकेने प्रत्येक गावाला प्रवेशद्वार बनवले आहे.