भेंडखळ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशीचा उत्सव
भेंडखळ सरपंचांनी अधोरेखित केले स्वच्छतेचे महत्व
उरण : येथील भेंडखळ गावात हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री विठ्ठल रखुमाईच जागूत मंदिर असून तेथे सालाबादप्रमाणे याही वर्षी उद्या २३ नोव्हेंबर रोजी कार्तिक शुद्ध एकादशी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणार आहे. या उत्सवाचे औचित्य साधून भेंडखळ ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ मंजिता मिलिंद पाटील यांनी स्वतः आपल्या हातात झाडू घेऊन ग्रामपंचायत सदस्य, गावातील महिला वर्ग यांच्या सहकार्याने गावातील अंतर्गत रस्ते स्वच्छ करून घेतले.
यावेळी त्यांनी मंदिर परिसरात गावातील अंतर्गत रस्तावर रांगोळी काढण्यासाठी पुढाकार घेतला. स्वच्छता हा आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा पैलू असून ते आपल्या जीवनाचे प्राधान्य देखील आहे. स्वच्छतेने आपण जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकतो.स्वच्छता ही सेवा आहे. स्वच्छतेचा अवलंब करूनच आपण आजार दूर करू शकतो. त्यासाठी ती प्रत्येकांनी अंगीकारणे गरजेचे असून आपल्या घराव्यतिरिक्त आजूबाजूच्या स्वच्छतेची ही प्रत्येकांनी काळजी घेतली पाहिजे असे प्रतिपादन भेंडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मंजिता मिलिंद पाटील यांनी यावेळी केले.