बौध्द विहार हटवलेल्या भूखंडावर अनधिकृत वाहनतळ?

बौध्द समाजामधून नाराजी  

नवी मुंबई : ‘सिडको'ने अनधिकृत ठरवून काही महिन्यापूर्वी पाडलेल्या घणसोली येथील बौध्द विहाराच्या जागेचा वापर अनधिकृत वाहनतळासाठी होत असल्याचे निदर्शनास आल्याने बौध्द समाजामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, अनधिकृत वाहनतळासाठी ‘सिडको'ने घणसोली मधील बौध्दविहार हटवले का?, असा प्रश्न बौध्द समाजाकडून उपस्थित केला जात आहे.  

घणसोली कॉलनी परिसरात असलेल्या तीन बौध्द विहारांवर प्रशासनाने काही वर्षांपूर्वी कारवाई केली होती. त्यानंतर गेल्या मे महिन्यामध्ये घणसोली परिसरातील एकमेव बौध्द विहार देखील ‘सिडको'च्या अतिक्रमण विरोधी पथकाने हटवले. सदर बौध्द विहार अनेक वर्षांपासून त्याठिकाणी असल्याने सदर भूखंड बौध्द विहारासाठी विकत द्यावा, अशी मागणी बौध्द समाजाकडून सिडकोकडे करण्यात आली होती. मात्र, सिडको प्रशासनाने सदर जागेवर बौध्द विहार असताना तसेच त्या जागेची बौध्द समाजाकडून मागणी होत असताना, सदर भुखंड बौध्द विहारासाठी न देता, एका गृहनिर्माण सोसायटीला देऊन टाकला. त्यानंतर ‘सिडको'ने सदरचा भूखंड गृहनिर्माण सोसायटीला दिल्याचे कारण पुढे करत सदर बौध्द विहारावर कारवाई करुन ते निष्काषित करुन टाकले.  

मागील १५ वर्षापासून सदर जागेवर असलेले एकमेव बौध्द विहार ‘सिडको'ने पाडून टाकल्याने ‘सिडको'च्या या कृतीचा बौध्द समाजाकडून निषेध देखील करण्यात आला होता. सदर जागेवरील बौध्द विहार पाडून टाकण्यात आल्यानंतर मागील सहा महिन्यांपासून सदरचा भूखंड वापराविना पडून आहे. तसेच प्रत्यक्षात सदर भूखंडाचा वापर अनधिकृत वाहनतळासाठी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारानंतर घणसोली मध्ये राहणाऱ्या बौध्द समाजामधून नाराजी आणि संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, अनधिकृत वाहनतळासाठी ‘सिडको'ने घणसोली मधील बौध्दविहार हटवण्याची कारवाई केली का?, असा प्रश्न ‘आरपीआय'चे नवी मुंबई प्रवक्ते सचिन कटारे यांनी उपस्थित केला आहे. 

 

--

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भेंडखळ येथील श्री विठ्ठल  रखुमाई मंदिरात कार्तिकी एकादशीचा उत्सव