सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडिकल कॉलेजचे मे महिन्यात भूमीपुजन

वर्षभरापासूनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मुर्तस्वरुप - आ. मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबईसारख्या शहरात आजही सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. बुध्दीमत्ता असूनही तरुण-तरुणींना डॉक्टरकी मिळण्यापासून वंचित राहावे लागत होते. याचा गंभीर विचार ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केला. त्यानुसार त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल- मेडिकल कॉलेजसाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केल्यामुळे आज सर्वसामान्य रुग्णांना तसेच वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामुळे फायदा होणार आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणींना यांना मोठा लाभ मिळणार आहे. या अनुषंगाने आज नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडिकल कॉलेजचे अंतिम सादरीकरण करण्यात आले. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मे महिन्याच्या शुभमुहूर्तावर या हॉस्पिटल-मेडिकल कॉलेजचे भूमीपुजन करणार असल्याचे बैठकीत सांगितले.  

याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत अतिरिवत आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त (मालमत्ता विभाग) डॉ. राहुल गेठे, सहाय्यक संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण, शहर अभियंता संजय देसाई, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडिकल कॉलेज ८.४० एकर क्षेत्रफळामध्ये उभारले जाणार असून अंदाजे ८१९ ते ८५० कोटी खर्च येणार आहे. तसेच सदर हॉस्पिटलमधील रुग्णाची क्षमता ५०० बेडस्‌ पेक्षा अधिक असून हॉस्पिटल पूर्णतः सर्व सुविधायुक्त बनणार आहे. तसेच उभारल्या जाणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडिकल कॉलेजवर पूर्ण नियंत्रण नवी मुंबई महापालिकाचे असणार आहे. त्याअनुषंगाने लवकरच सिडको सोबत महापालिकेचा करार होणार असून निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.    

राज्य सरकार, सिडको आणि महापालिकेकडून लागणाऱ्या सर्व मान्यता आणि मंजुरी, परवानग्या मिळाल्याने निविदा प्रकियेला नवी मुंबई महापालिकेकडून सुरुवात होणार आहे. तसेच शासन दरबारी, ‘सिडको'कडे पाठपुरावा केल्यामुळे नवी मुंबईकरांना आरोग्य सेवा मिळणार आहेत. शिवाय वैद्यकीय शिक्षण घ्ोणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. हॉस्पिटलची वास्तू तळमजला अधिक ७ मजल्याची असून ४०० हून अधिक वाहन तळाची व्यवस्था होणार आहे. हृदय, मेंदू यासह इतर अनेक मोठमोठ्या आजारांवर सेवा दिली जाणार आहे. तसेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मधील रुग्णांची क्षमता ५०० बेडस्‌ हुन अधिक असून हॉस्पिटल पूर्णतः सर्व सुविधायुक्त बनणार आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

विविध आजारांवर उपचाराकरिता लागणारी सर्व यंत्रणा, शस्त्रक्रिया आणि इतर सुविधा या प्रत्येक मजल्यावर उपलब्ध होणार आहे. याशिवाय पीजी, नर्सिंग शैक्षणिक वसतीगृह, पदव्युत्तर शैक्षणिक संकुल, अभियांत्रिकी यार्ड, रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना राहण्यासाठी धर्मशाळा, नर्सिंग वस्तीगृह, अभ्यागत केंद्र, पदव्युत्तर वसतीगृह यासह इतर अनेक सुख-सुविधा उपलब्ध होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.  

नवी मुंबईतील नागरिकांना सुसज्ज आरोग्य सुविधा मिळणे अत्यावश्यक आहे. पुढील काही वर्षात नवी मुंबईत होणारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडिकल कॉलेज नवी मुंबईकरांसाठी क्रांती ठरेल. नवी मुंबई हद्दीतील रुग्णांना उपचाराकरिता बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे या रुग्णांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. तसेच स्थानिक नागरिकांना रोजगार निर्माण होणार आहे. गेल्या एक वर्षापासून या कामासाठी जो लढा सुरु होता, त्या लढ्याला खऱ्या अर्थाने एक मुर्तस्वरूप महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, तत्कालीन ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी तसेच नवी मुंबई महानगरपालिका, सिडको मधील संबंधित अधिकाऱ्यांनी दिला, त्याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करते. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रेल्वे स्थानकावरील रॅम्प तोडून त्या जागी लोखंडी रेलिंग