रेल्वे स्थानकावरील रॅम्प तोडून त्या जागी लोखंडी रेलिंग
हार्बर मार्गावरील स्थानकापासून रेलिंगच्या कामाला सुरुवात
नवी मुंबई : प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडून जाऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, त्यानंतर देखील अनेक प्रवाशी पादचारी पुलाचा वापर न करता शॉर्टकट मारण्याच्या नादात रेल्वे रुळ ओलांडून जात असल्याने अनेक प्रवाशांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने पलॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूकडील रॅम्प तोडून त्याजागी लोखंडी रेलिंग बसविण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात ‘मध्य रेल्वे'ने हार्बर मार्गावरील सर्रास रेल्वे रुळ ओलांडल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानकांवरील दोन्ही बाजुकडील रॅम्प तोडून त्या ठिकाणी लोखंडी रेलिंग बसविण्याचे काम हाती घेतले आहे.
रेल्वे प्रशासनाद्वारे ‘मिशन जीवनरक्षा' अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमातंर्गत रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे. मागील ३ वर्षात रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या ५० हजारांहून अधिक प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. याबरोबरच उपनगरीय रेल्वे मार्गावरील विविध स्थानकांत जनजागृती करण्यासह यमराज अभियान देखील राबविण्यात येत आहे. मात्र, त्यानंतर देखील प्रवाशांकडून रेल्वे रुळ ओलांडण्याचे प्रकार सुरुच आहेत. त्याशिवाय दंडात्मक कारवाई, रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी प्रवाशांना मज्जाव करणे, उद्घोषणा अशा विविध उपाययोजना करण्यात येऊन देखील प्रवाशांकडून स्वतचे जीव धोक्यात घालणे सुरुच आहे.
रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानकात सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. मात्र, शॉर्टकट मारण्याच्या आणि वेळ वाचवण्याच्या नादात अनेक प्रवाशी स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडून जात आहेत. त्यामुळे ‘मध्य रेल्वे'ने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांतील रॅम्प तोडून त्याजागी लोखंडी रेलिंग बसवण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानकांतील रॅम्प तोडल्यानंतर प्रवाशांना रेल्वे स्थानकावर जाता येणार नसल्यामुळे प्रवाशांची रेल्वे रुळ ओलांडून फलाटावर जाण्याची सवय मोडली जाऊन प्रवाशी पादचारी पूलाचा वापर करतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकात पादचारी पूल, सरकते जिने (एक्सलेटर), लिपट उभारण्याचे काम हाती घेतले आहे. यापैकी बहुतेक रेल्वे स्थानकात पादचारी पुल, सरकते जिने आणि लिपट उभारण्याचे काम पुर्ण झाले आहे. तर काही स्थानकातील कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे रुळ न ओलांडता पादचारी पूल, सरकते जिने, लिपट यांचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांतील रॅम्प तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरात लवकर सर्व रॅम्प तोडून त्याजागी लोखंडी रेलिंग बसवण्यात येतील. वर्ष अखेरपर्यंत सर्वाधिक रेल्वे स्थानकावरील रॅम्प तोडण्यात येणार असून, त्याजागी रॅलिंग बसवण्यात येणार आहेत. प्रवाशांनी पादचारी पूल, सरकते जिने यांचा वापर करत स्वतःचा मौल्यवान जीव वाचवावा, अशी रेल्वे प्रशासनाची अपेक्षा आहे. - प्रविण पाटील, जनसंपर्क अधिकारी - मध्य रेल्वे, मुंबई.