सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकाला मुर्बी गांव नाव देण्याची मागणी

सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकाला मुर्बी गावाचे फलक

खारघर : ‘नवी मुंबई मेट्रो'च्या लोकार्पण सोहळ्याचे नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. मात्र, या ‘मेट्रो'च्या ११ स्थानकांपैकी एक असलेल्या सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकाला मुर्बी गांव नाव देण्यास सिडको टाळाटाळ करीत असल्याने मुर्बी ग्रामस्थांनी मुर्बी गावाचे फलक या स्थानकाला लावले आहेत.

नवी मुंबई मेट्रो मार्गात असलेल्या बेलपाडा, खारघरगांव, पेठपाडा, पेठाली आणि पेंधर आदि गावालगत असलेल्या स्थानकाला संबंधित गावाचे नाव देण्यात आले आहे. तर सेंट्रल पार्क स्थानक लगत असलेल्या मेट्रो स्थानकाला मुर्बी गावाचे नाव देण्यासाठी ग्रामपंचायत काळात ‘सिडको'कडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. दरम्यान, या मागणीकडे ‘सिडको'कडून  दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे मागील महिन्यात मुर्बी ग्रामस्थांनी एक दिवसीय  लाक्षणिक उपोषण पुकारले होते. तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला होता.

‘सिडको'ने गावाजवळील सर्वच स्थानकांना गावांची नावे दिली आहेत. मग, मुर्बी गावावर अन्याय का? असा प्रश्न ‘गांव कमिटी'चे सदस्य, शिवसेना विभाग प्रमुख मनेश पाटील यांनी उपस्थित केला आहे. सिडको मेट्रो स्थानकाला मुर्बी गांव देण्यास दिरंगाई करीत असल्यानेच आम्ही स्वतः मुर्बी गावाचे फलक या स्थानकाला लावून नामकरण केले आहे. ‘सिडको'ने लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा, असेही  ग्रामस्थ मनेश पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात ‘सिडको'ेच्या मेट्रो विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष ओंबासे यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 डिसेंबर अखेर ‘टीएमटी'च्या तापयात नवीन ४३ इलेक्ट्रिक बस