‘आदर्श सेवाभावी सामाजिक संस्था'ची आदिवासी भगिनींना भाऊबीज भेट
खारघर आदिवासी पाड्यात ‘आदर्श सेवाभावी सामाजिक संस्था'ने आदिवासी भगिनींसोबत अनोख्या पध्दतीने भाऊबीज साजरी
खारघर : सर्वत्र दिवाळीचा सण उस्ताहात साजरा होत असताना सोयी सुविधांपासून वंचीत असलेल्या खारघर आदिवासी पाड्यात ‘आदर्श सेवाभावी सामाजिक संस्था'ने आदिवासी भगिनींसोबत अनोख्या पध्दतीने भाऊबीज साजरी केली. या उपक्रमातून खारघर मधील घोळवाडी आदिवासी पाड्यातील भगिनींना साड्या आणि दिवाळी फराळ, अन्नधान्य तसेच लहान मोठ्यांना गोड पदार्थ भाऊबीज भेट देण्यात आले.
याप्रसंगी परिमंडळ-२ चे पोलीस उपायवत पंकज डहाणे, ‘बँक ऑफ मॉरिशस'चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कदम, ज्येष्ठ पत्रकार विश्वरथ नायर, नवी मुंबई महापालिका समाज विकास विभागाचे समाजसेवक दशरथ गंभीर, सामाजिक कार्यकर्ते गणेश पेडामकर, मेघनाथ ठाकूर, ‘कै. विनायक पाटील सामाजिक संस्था'चे अध्यक्ष मनेश पाटील, शिक्षक दीपक शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या संध्या जैन, ग्रामस्थ रवी कातकरी, आदि उपस्थित होते.
आदर्श सेवा भावी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील समाज बांधवांसोबत दिवाळी साजरी करताना समाधान वाटत असल्याचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.
खारघर शहरात सिडकोने उभारलेल्या सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स तसेच होवू घातलेल्या कॉर्पोरेट पार्क मुळे शहराचे नाव जगभर झाले. खारघर शहरात टोलेजंग इमारती उभ्या आहेत. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या आदिवासी पाडे विकासापासून दूर आहे. त्यामुळे शिक्षणापासून दूर राहिलेल्या तुमच्या मुलांना चांगले शिक्षण द्या, असा सल्ला पत्रकार विश्वरथ नायर यांनी दिला. तर शिक्षण आपला तिसरा डोळा आहे.त्यामुळे मुलांना चांगले शिक्षण द्या, असे समाजसेवक दशरथ गंभीर म्हणाले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुणाल ठाकूर, प्रथमेश पेडामकर ,निरंजन कदम, ऋषिकेश शेलार, लक्ष्मण ठाकूर, विलास कातकरी, ‘आदर्श सेवाभावी सामाजिक संस्था'चे गजानन चव्हाण आदिंनी मेहनत घेतली.