सार्वजनिक रस्त्यावर खाजगी कंपनीची दादागिरी?

खाजगी कंपनीच्या दादागिरीची महापालिका, वाहतूक पोलिसांकडून दखल

वाशी : दिघा एमआयडीसी मधील सार्वजनिक रस्त्यावर खाजगी कंपनीने परस्पर बॅरिगेट लावून वाहतूक बदल केला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सदर कंपनी व्यतिरिक्त इतर वाहनांच्या चालकांवर वाहतुकीत सुरक्षा रक्षक आणि बाऊंसरच्या माध्यमातून दादागिरी करत वाहतूक बदल केली जात आहे.

एखाद्या शहरात रस्त्यावर स्थापत्य काम सुरु असताना किंवा इतर कारणास्तव वाहतूक बदल करायचा असेल तर  वाहतूक विभाग रितसर प्रसिध्द पत्रक काढतात. तसेच वाहतूक बदल ठिकाणी फलक लावतात. मात्र, दिघा एमआयडीसी मधील रिलायबल प्लाझा समोरील सार्वजनिक रस्त्यावर एका खाजगी कंपनीने आपला हक्क सांगत वाहतुकीत परस्पर बदल केला आहे. याठिकाणी आयटी कंपनी असून रोज शेकडो वाहने येतात. त्यामुळे आपल्या कंपनीत येणाऱ्या वाहनांना सुलभ प्रवेश मिळावा म्हणून रस्त्यात बॅरिगेट उभे केले आहेत. जर कोणी याबाबत विचारणा केली तर त्यांना येथील सुरक्षा रक्षक आणि बाऊन्सरच्या माध्यमातून दादागिरी केली जाते.

यामुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने सदर  सार्वजनिक रस्ता महापालिका आणि एमआयडीसी यांनी सदर खाजगी कंपनीला परस्पर विकला आहे का? असा सवाल वाहन चालकांनी उपस्थित केला आहे.

सदर रस्त्यावर परस्पर बॅरीगेट लावल्याप्रकरणी कारवाई करण्याच्या सूचना वाहतूक शाखेला देण्यात आल्या आहेत. तसेच यापुढे अशा प्रकारे बॅरीगेट लावू नये, असा समज देखील या कंपनीस देण्यात आला आहे. - डॉ. कैलास गायकवाड, विभाग अधिकारी-दिघा, नवी मुंबई महापालिका.

रस्त्यावर परस्पर बॅरिगेट लावल्याप्रकरणी संबंधित कंपनीला १४९ अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच यापुढे अशा प्रकारे बॅरिगेट लावू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. -संजय बेंडे, पोलीस निरीक्षक - रबाले वाहतूक शाखा. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे रविवारी मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन