शालेय विद्यार्थ्यांकरिता विशेष दिवाळी शिबीर

मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नवी मुंबई महापालिकेचा उपक्रम

नवी मुंबई : दिवाळीच्या सुट्टीमध्ये शिबीराच्या ( Diwali Vacation Camp  ) माध्यमातून मुला-मुलींचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आणि त्यांचा बौध्दिक स्तर उंचविण्यासाठी नवी मुंबई महापालिका समाजविकास विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांकरिता विशेष दिवाळी शिबीर १८ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आलेले आहे.

या शिबीरात व्यक्तिमत्व विकास, योगा-फिटनेस वर्ग, हस्तकला वर्ग, वत्कृत्व विकास, चित्रकला वर्ग, नाट्य वर्ग, नृत्य वर्ग, बाल पुस्तक वाचन अशा प्रकारे विविध विषयांवरील उपक्रमांतून विदयार्थ्यांना समृध्द केले जाणार आहे. १८ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत प्रत्येक आठही विभागातील मध्यवर्ती ठिकाणी महापालिकेच्या शाळा सभागृहांमध्ये सदर शिबीर दररोज साधारणतः २ तास संपन्न होणार असून यामुळे विद्यार्थ्यांची दिवाळी सुट्टी आनंददायी होणार आहे. तसेच त्यांच्या अंगभूत गुणांना चालना मिळणार आहे.

आठ विभाग कार्यालय क्षेत्रातील शिबीराची ठिकाणे आणि तेथील वेळा समाजविकास विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये बेलापूर विभागात शाळा क्रमांक-१ बेलापूर गाव (सकाळी ११.३० ते दुपारी १), नेरुळ विभागात नमुंमपा शाळा क्र.१४-१५ शिरवणेगांव (सकाळी ९.३० ते ११), वाशी विभागात शाळा क्र.२८, शंकरराव विश्वासराव विद्यालय वाशी (सकाळी ११.३० ते दुपारी १), तुर्भे विभागात शाळा क्र.२४ तुर्भे स्टाअर्स (सकाळी ९.३० ते ११), कोपरखैरणे मध्ये शाळा क्र. ११४/३१-२३२, से-५ कोपरखैरणे (सकाळी ११.३० ते दुपारी १), घणसोली विभागात शाळा क्र.४२ घणसोली गांव (सकाळी ९.३० ते ११), ऐरोली मध्ये शाळा क्र.९१, सेक्टर-७, दिवा-ऐरोली (सकाळी ११.३० ते  दुपारी १), दिघा विभागात बिंदुमाधवनगर बहुउद्देशीय इमारत, दिघा (सकाळी ९.३० ते ११) अशा आठ ठिकाणी सदर शिबीरे संपन्न होणार आहेत.

या शिबीराद्वाारे मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना सुट्टीचा उपयोग करुन घेता यावा, त्यांच्यामधील कला जोपासता यावी, त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्यांच्या विविध समस्या सोडविण्यास मदत व्हावी, त्यांच्यात एकमेकांत देवाण-घेवाण व्हावी आणि मदत करण्याची भावना तयार व्हावी, त्यांची तणावमुक्ती व्हावी तसेच त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी-संवेदनशीलता वाढीस लागावी, असा उद्देश नजरेसमोर ठेवण्यात आलेला आहे.

वय वर्ष ६ ते १४ वयोगटातील मुले विहित नमुन्यातील अर्ज भरुन आपल्या विभागातील शिबीराचा लाभ घेऊ शकतात. याबाबतच्या अधिक माहितीसाठी बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे विभागातील मुलांनी दादासाहेब भोसले यांच्याशी ९३७२१०६९७६, ९८१९५५५२२० या भ्रमणध्वनी क्रमांकावर तसेच कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा विभागातील मुलांनी दशरथ गंभीरे यांच्याशी ९७०२३०९०५४, ९००४७६१६४० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे सूचित करण्यात येत आहे.

सध्याच्या ऑनलाईन युगात मोबाईलला आणि ऑनलाईन गेमला जोडली गेलेली मुले या शिबीराच्या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीतून करावयाच्या उपक्रमांशी जोडली जावीत. त्यांचा सर्वांगीण असा व्यक्तित्व विकास व्हावा यादृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या दिवाळी शिबीराचा लाभ जास्तीत जास्त मुलांनी करुन घ्यावा. पालकांनी आपल्या मुलांना त्यासाठी प्रोत्साहित करावे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 दिवाळी सुट्टी निमित्त बालनाट्य शिबीर