‘एनएमएमटी'च्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना कोव्हीड भत्ता देण्याची मागणी

‘नवी मुंबई इंटक'चे आयुवत, परिवहन व्यवस्थापकांना निवेदन

नवी मुंबई : कोरोना महामारीच्या काळात नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या बसेसच्या माध्यमातून जनसेवेचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चालक, वाहक, वाहतूक नियत्रंक, लिपीक यांच्यासह इतर कर्मचारी, अधिकारी वर्गाला तसेच ठोक मानधनावरील वाहक, चालकांना तसेच इतर कर्मचाऱ्यांना कोव्हीड भत्ता तात्काळ देण्याची मागणी ‘इंटक'चे नवी मुंबई अध्यक्ष तथा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि परिवहन व्यवस्थापकांकडे निवेदनातून केली आहे.

कोरोना महामारीच्या काळात दोन वर्षाच्या कालावधीत महापालिका परिवहन उपक्रमाने चालक, वाहक, वाहतूक नियत्रंक, लिपीक, इतर कर्मचारी-अधिकारी वर्ग तसेच ठोक मानधनावरील वाहक, चालक, आदिंच्या परिश्रमामुळे मौल्यवान कामगिरी केलेली आहे. कोरोना काळात नवी मुंबईकरांना प्रवासी सुविधा अहोरात्र परिवहन उपक्रमाने दिलेली आहे. याशिवाय कोरोना रुग्णांची कोव्हीड सेंटरमध्ये ने-आण करण्यासाठी ‘एनएमएमटी'च्या बसेसने रुग्णवाहिका सारखे अहोरात्र काम केले आहे. महापालिका प्रशासनाने कोरोना महामारीच्या काळात काम करणाऱ्या परिवहन विभागाचा अपवाद वगळता अन्य सर्वच आस्थापनेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांना कोव्हीड भत्ता दिलेला आहे. इतकेच नाही तर सुरक्षेचे काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांनाही कोव्हीड भत्ता देण्यात आलेला आहे. परंतु, कोव्हीड कालावधीत प्रवासी सुविधा पुरविण्याचे जिकरीचे कार्य करणाऱ्या महापालिका परिवहन उपक्रमातील (एनएमएमटी) चालक, वाहक, वाहतूक नियत्रंक, लिपीक तसेच इतर संबंधित अधिकारी-कर्मचारी यांना आजतागायत प्रशासनाकडून कोव्हीड भत्ता देण्यात आलेला नाही, असे रविंद्रसावंत यांनी महापालिका आयुवतांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

या सर्व घटकांना महापालिका प्रशासनाने कोव्हीड भत्ता देण्यासाठी आम्ही सातत्याने महापालिका प्रशासनाकडे लेखी पाठपुरावाही केलेला आहे. त्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांच्या दालनात चपलाही झिजविल्या आहेत. अधिकाऱ्यांनी त्याअनुषंगाने फाईलही बनविल्या होत्या. परंतु, पुढे त्या फाईलचे काय झाले तेच समजले नाही? त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात घेता कोव्हीड भत्यापासून आजही वंचित असलेल्या ‘एनएमएमटी' मधील चालक, वाहक, वाहतूक नियत्रंक, लिपीक आणि इतर कर्मचारी-अधिकारी वर्गाला कोव्हीड भत्ता तात्काळ देण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे केली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शालेय विद्यार्थ्यांकरिता विशेष दिवाळी शिबीर