इंडियन ऑईल विरोधात धुतूम ग्रामस्थ आक्रमक

भूमीपुत्रांना नोकऱ्या द्या; अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

उरण : उरण तालुक्यातील धूतुम ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या इंडीयन ऑईल टँकींग अर्थात इंडीयन ऑईल अदानी व्हेंचर्स या कंपनीत गेल्या २५ वर्षात स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीत सामावून न घेता सतत परप्रांतियांना नोकरीत स्थान दिले जात आहे. यामुळे स्थानिक भूमीपुत्र अजुनही बेरोजगार राहिला आहे. पर्यायाने सदर कंपनी प्रशासनाने स्थानिक तरुणांना तत्काळ रोजगार द्यावा या प्रमुख मागणीसाठी कंपनी विरोधात २० नोव्हेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा धुतूम ग्रामस्थांनी दिला आहे.

१९९७ साली धुतूम ग्रामपंचायत हद्दीमध्ये इंडीयन ऑईल टँकींग कंपनी सुरु झाली. या कंपनीसाठी सुमारे ८५ शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्यावेळी जमीन देणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना कंपनीच्या नोकर भरतीत सामावून घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, गेल्या २५ वर्षांत गावातील फक्त तिघांना कंपनीच्या मुख्य कर्मचाऱ्यांमध्ये सामावून घेण्यात आले असून बहुतेक कामगार भरती परराज्यातून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाचा जाब गेल्या २५ वर्षात कोणीच विचारला नाही. त्यामुळे सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी सरपंच पदाचा कारभार हाती घेताच आय.वो.टी.एल. कंपनीच्या बेलगाम कारभाराविरोधात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

इंडियन ऑईल कंपनीसाठी सुमारे ८५ शेतकऱ्यांनी आपल्या बहुमूल्य जमिनी दिल्याने या कंपनीत त्यांना नोकऱ्या आजपावेतो का दिल्या नाहीत? याचा जाब सरपंच सुचिता ठाकूर यांनी ग्रामस्थांसह कंपनीत जाऊन कंपनी प्रशासनाला विचारला. इंडियन ऑईल कंपनी प्रशासन प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा सुरुच राहील, असा निर्धार धुतूम ग्रामस्थांनी केला आहे.

गावात अनेक मुले-मुली उच्चशिक्षित असूनही त्यांना नोकर भरतीत सामावून न घेता कंपनी प्रशासन स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय करीत असल्याची भावना व्यक्त करुन इंडीयन ऑईल अदानी व्हेंचर्स कंपनीने आपली हुकूमशाही वृत्ती बदलली नाही तर कंपनीच्या प्रवेशद्वारात २० नोव्हेंबर पासून आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा सरपंच सुचिता ठाकूर यांनी दिला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘एनएमएमटी'च्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना कोव्हीड भत्ता देण्याची मागणी