सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कॅलिग्राफीवरील ‘चान्सरीग्राफी' पुस्तकाचे प्रकाशन

चान्सरीग्राफी सुलेखनासाठी मार्गदर्शक अक्षरदिवा - आयुक्त नार्वेकर

नवी मुंबई : बेलापूर रेल्वे स्टेशन कमर्शिअल कॉम्प्लेक्स आणि अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अक्षर दिवाळी' कार्यक्रमांतर्गत सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कॅलिग्राफीवरील ‘चान्सरीग्राफी' या नवीन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते बेलापूर रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स येथे संपन्न झाला. याप्रसंगी सुलेखनकार अच्युत पालव, बेलापूर रेल्वे स्टेशन कमर्शिअल कॉम्प्लेक्सचे संचालक भार्गव, ऊर्जा प्रकाशनच्या प्रमुख श्रध्दा पालव, कॉम्प्लेक्सचे पदाधिकारी वैभव महाजन आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

शब्दांमधील अक्षरांमध्येही ‘बिटविन द लाईन्स' असे भाव असतात, ते सुलेखनकार अच्युत पालव यांच्यामुळे समजले. अच्युत पालव यांची अक्षरावर हुकूमत पाहून थक्क व्हायला होते अशा शब्दात पालव यांच्या सुलेखनाचा गौरव करीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लहानपणापासून अक्षर चांगले असल्याने सुलेखनाची आवड होती आणि चांगले अक्षर प्रेम करायला लावते याची जाणीव असल्याने अच्युत पालव यांच्याकडून सुलेखनाचे धडे घ्यावेत, अशी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. ती कामाच्या व्यस्त दिनक्रमात पूर्ण होऊ शकली नाही तरी आज अच्युत पालव लिखीत सुलेखनावरील पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा योग लाभला हीच आपल्यासाठी आनंददायी गोष्ट असल्याचे आयुक्त नार्वेकर यांनी सांगितले.

यावेळी सुलेखनकार अच्युत पालव यांनी चांगले लिहिण्याची लहानपणापासून लागलेली आवड, सुलेखनकलेची जोपासना करण्यासाठीचे श्रम आणि या कलेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न याविषयीच्या विविध आठवणी सांगितल्या. जगभरातील लोकांपर्यंत आपल्या देवनागरीचे महत्व नेता आले, मोडी लिपीचे वेगळेपण प्रसारित करता आले याचे एक वेगळे समाधान असल्याचे ते म्हणाले. ‘चान्सरीग्राफीे' चान्सरी शैलीतील कॅलिग्राफीचे मॅन्युअल स्वरुपातील पुस्तक शैली शिकण्याच्या मूलभूत गोष्टींशी ओळख करुन देईल. त्यादृष्टीने लिहिताना बसण्याच्या योग्य पध्दतीपासून, कागद ठेवण्याची आणि पेन पकडण्याची पध्दत सांगण्यासोबतच अक्षर लेखनाची तयारी आणि सरावही करुन घेईल, अशी माहिती अच्युत पालव यांनी दिली. ‘चान्सरीग्राफी' पुस्तक म्हणजे अक्षर चांगले व्हावे अशी इच्छा असणाऱ्यांसाठी तसेच मुलांचे अक्षर चांगले व्हावे असे वाटणाऱ्या पालकांसाठी दिवाळीचा अक्षरमेवा असून दिवाळीची भेट म्हणून पुस्तक दिल्यास ते अनेकांसाठी सुलेखनाची प्रेरणा ठरेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन करीत कार्यक्रम रंगतदार केला.

दरम्यान, यावेळी ‘अच्युत पालव स्कूल ऑफ कॅलिग्राफी'च्या १५ सुलेखनकार विद्यार्थ्यांनी शुभ दीपावली असा संदेश विविध १५ भाषांमध्ये गोलाकार लिहून १० फुट बाय १० फुट आकाराची मोठी अक्षर रांगोळी रेखाटली. या रांगोळीमध्ये आयुक्तांच्या समक्ष ‘रंग दिवाळी अक्षर दिवाळी' असा रंगाक्षरांचा शुभेच्छा संदेश काही क्षणात रेखाटत सुलेखनकार अच्युत पालव यांनी शुभेच्छा रंग भरले.

नवी मुंबई शहराविषयी असलेली बांधिलकी जपत सुलेखनकार अच्युत पालव यांनी नवी मुंबई महापालिकेच्या आगळ्या-वेगळ्या चित्रकाव्यभिंती संकल्पनेला आपल्या सुलेखनाने जिवंत केले. त्या कविता इतक्या आकर्षक अक्षरांनी अच्युत पालव यांनी सजविल्या की कुणालाही अक्षरे पाहूनच त्या वाचण्याचा मोह व्हावा. चान्सरी शैलीतील कॅलिग्राफीचे मॅन्युअल सुलेखनाची आवड असणा-या प्रत्येकाला मार्गदर्शक दिशा दाखविणारा अक्षरदिवा ठरेल. -राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बहुप्रतिक्षित ‘नवी मुंबई मेट्रो'ला ग्रीन सिग्नल