सिमेंट काँक्रीट प्रकल्पाद्वारे धूळ प्रदुषण

प्रदुषणकारी प्रकल्पांना वेसण घालणार कोण? पर्यावरणप्रेमींचा सवाल

वाशी : मुंबई आणि परिसरात वाढत्या धुळ प्रदुषणाची दखल घेऊन उच्च न्यायलयाने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका सतर्क झाली असून आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आदेश काढले आहेत. यात डेब्रीज वाहतुकीवर बंदी, स्प्रिंकल स्प्रे आदिंचा समावेश आहे. मात्र, ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या दुर्लक्षामुळे शहरातील सिमेंट काँक्रीट प्रकल्पातून धूळ प्रदुषण होत आहे. त्यामुळे धूळ प्रदुषण करणाऱ्या या सिमेंट काँक्रीट प्रकल्पांना वेसण घालणार कोण? असा सवाल पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.

नवी मुंबई शहरात औद्योगिक वसाहतीत बंद पडलेल्या दगडखाणींच्या जागेत तयार सिमेंट काँक्रीट प्रकल्प (आरएमसी प्लांट) आहेत. तर आता शहरी भागात देखील पुनर्विकास सुरु असलेल्या ठिकाणी असे प्रकल्प उभे केले गेले आहेत. मात्र, यातील बहुतांशी प्रकल्प चालक ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'ने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे या प्रकल्पातून आज मोठ्या प्रमाणात धूळ प्रदुषण होताना दिसत आहे. परिणामी, येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

मागील १५ ते २० दिवसांपासून मुंबई आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ प्रदुषण होऊन हवेचा दर्जा खालावला आहे. याची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वतःहुन सुमोटो याचिका दाखल केली आहे. धूळ प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता धूळ प्रदुषण संदर्भात नवी मुंबई महापालिका देखील सतर्क झाली असून आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ७ ठिकाणी हवा गुणवत्ता मापन केंद्रातून रिडींगचे दर दोन तासांनी निरीक्षण करावे आणि त्यामध्ये आढळणाऱ्या रिडींग प्रमाणे आवश्यक कार्यवाही करावी, असे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले आहे.

बांधकाम साईटस्‌ तपासण्यासाठी नगररचना आणि अभियांत्रिकी विभागातील अभियंत्यांची विशेष पथके विभागनिहाय गठीत करण्यात आली असून त्यांनी दररोज केलेल्या कार्यवाहीचा तपशील वेबपेजवर नियमीत अपलोड करण्यास सुचविण्यात आले आहे. तसेच बांधकाम साईटस्‌ वरील डेब्रीज वाहतूक पूर्णपणे बंद राहील. स्प्रींकल स्प्रेने रस्ते दुभाजक धुणे. शहरातील सर्व कारंजे सुरु ठेवणे, असे निर्देश देण्यात आले आहे. मात्र, ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या दुर्लक्षामुळे शहरातील सिमेंट काँक्रीट प्रकल्पातून धूळ प्रदुषण निर्माण होत आहे. त्यामुळे धूळ प्रदुषण करणाऱ्या या सिमेंट काँक्रीट प्रकल्पांना आता कोण वेसण घालणार? असा सवाल पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.

सिमेंट काँक्रीट प्रकल्पातील धूळ पप्रदूषणाची मिरा-भाईंदर महापालिकेने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकल्पांमधून प्रदुषण होऊन त्याचा परिसरातील रहिवाशांना त्रास होऊ नये यासाठी महापालिकेने नवे धोरण निश्चित करून या प्रकल्पांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

सिमेंट प्रकल्प रहिवासी क्षेत्रापासून किमान पाचशे मीटर दूर असावेत आणि प्रकल्पातून निघणाऱ्या धुळीचे संबंधित प्रकल्पांनी नियंत्रण करावे, असा ठराव महापालिकेने संमत केला आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने देखील सिमेंट प्रकल्पांबाबतीत कडक धोरण तयार केल्यास धूळ प्रदुषण कमी होईल. - बाळासाहेब शिंदे, अध्यक्ष-पर्यावरण सेवा भावी संस्था, नवी मुंबई.

मार्गदशन तत्वेः
प्रकल्पाच्या परिसरातील खुल्या भागाचे काँक्रीटीकरण करणे, प्रकल्पामध्ये ध्वनी आणि धूळ नियंत्रण यंत्रणा बसवणे, प्रकल्पाच्या हद्दीवर सभोवताली वीस मीटर उंचीचे पत्रे लावणे, त्यावर हिरव्या रंगाची जाळी लावणे, वृक्ष लावणे, विशिष्ट बांधकाम प्रकल्पासाठी उभारलेला आरएमसी प्रकल्प त्या बांधकाम परिसरातच असावा.

औद्योगिक वसाहतीतील सिमेंट काँक्रीट प्रकल्पांना महापालिका ना-हरकत प्रमाणपत्र देत नाहीत. तरी देखील अशा प्रकल्पांतून धूळ प्रदुषण होत असेल तर उचित कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला पत्र लिहून कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील. -शिरीष आरदवाड, विभाग प्रमुख-पर्यावरण विभाग तथा अतिरिक्त शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गड-किल्ल्यातून ग्रामीण भागात जपला जातोय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास