शांतीवन नेरे, स्वप्नालय बालगृह आणि डोंगरीचा पाडा, वाझे येथे संवेदनातर्फे दिवाळी साजरी
‘संवेदना'च्या सख्यांनी तीन केंद्रांत वंचितांसाठी दिवाळीत केले मदतकार्य
पनवेल : ‘संवेदना चॅरिटेबल संस्थे'तर्फे पनवेल जवळील पिंपळवाडी वाझे येथील आदिवासी पाडा तसेच नेरे येथील शांतीवन कुष्ठरोग केंद्रातील हॉस्पिटल, तेथेच वास्तवात असलेले कुष्ठरोगी, तेथील वृध्दाश्रम, आधारगृहात इ. ठिकाणी दिवाळी फराळ वाटप तसेच तेथील परिसरात गरज असलेले तीन सोलर पॅनेल दिवाळी निमित्ताने ११नोव्हेंबर रोजी भेट देण्यात आले. यावेळी मधुरा गवाणकर हिचा वाढदिवस आजी आजोबांसोबत केक कापून साजरा करण्यात आला.
१२ नोव्हेंबरला नरकचतुर्दशी-लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी स्नेहालय बालगृहातील मुलींबरोबर दिवाळी साजरी करण्यात आली. त्यांना सुकामेवा आणि स्वयंपाक घरात उपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो; हाच आनंदाचा क्षण संवेदना सख्या दरवर्षी वृध्दाश्रमात जाऊन आजी आजोबा किंवा आदिवासी बांधवांबरोबर साजरा करत आहेत. तेवत असलेली पणती त्याग भावना दर्शवत स्वतः जळत राहून इतरांना प्रकाश देत असते, हीच भावना अंगी बाणवून आपल्याबरोबरच इतरांना या सणाचा आनंद देण्याचा प्रयत्न केला तर त्याचे आपणास लाभलेले समाधान खूप वेगळे या विचाराने प्रेरीत होत संस्था या प्रकारच्या कामात योगदान देत असते. संस्थेच्या सख्या स्वतःच्या घरात दिवाळी साजरी करण्यापूर्वी अश्या वंचित सामाजिक घटकांबरोबर दिवाळी साजरी करतात याचा आनंद वेगळा असून ह्याचा प्रत्यय आपण प्रत्येकाने घेऊन बघावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा गवाणकर यांनी व्यक्त केले.