नवी मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट

६५ वर्षावरील ज्येष्ठांना ‘एनएमएमटी'चा मोफत प्रवास

नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणारे शहर अशी नवी मुंबईची ओळख आहे. त्याअनुषंगाने आता नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना एनएमएमटी बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा १३ नोव्हेंबर पासून उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जाहीर करीत नवी मुंबईकर ज्येष्ठांना दिवाळी भेट देण्यात आलेली आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने नुकतेच तसे जाहीर करण्यात आले असून ज्येष्ठ नागरिकांना आणखी एक दिलासा मिळालेला आहे.

नवी मुंबईकर प्रवाशांना समाधानकारक सेवा पुरविणारा उपक्रम म्हणून नवी मुंबईकरांची नेहमीच एनएमएमटी प्रवासाला पसंती लाभली असून ‘एनएमएमटी'च्या तापयातील डिझेलवर चालणाऱ्या २०५, सी.एन.जी. वर चालणाऱ्या ८५ तसेच वातानुकूलीत व्होल्वो ५६ आणि वातानुकूलित इलेक्ट्रीक १९५ अशा एकूण ५४१ बसेस आहेत.

परिवहन उपक्रमामार्फत नवी मुंबई महापालिका हद्दीत आणि हद्दीबाहेर मुंबई, बोरिवली, ठाणे, भिवंडी, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, पनवेल, खोपोली, कर्जत, रसायनी आणि उरण या भागात ४३ सर्वसाधारण तसेच ३२ वातानुकुलित अशा एकूण ७५ बस मार्गांवर प्रवाशी सेवा देण्यात येत आहे.

सद्यस्थितीत ‘एनएमएमटी'च्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महापालिका क्षेत्रातील ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा आदर करीत त्यांना बस प्रवास शुल्कात ५० % सवलत दिली जात आहे. ‘एसटी'मार्फत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना १७ मार्च २०२३ पासून बसमध्ये मोफत प्रवासाची सवलत देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर ‘एनएमएमटी'च्या बसेसमध्ये वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना सुध्दा मोफत प्रवासाची सवलत देण्यात यावी,अशी मागणी महापालिका क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून सातत्याने करण्यात आली होती. याबाबत सकारात्मक विचार करुन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर १३ नोव्हेंबर २०२३ पासून महापालिका क्षेत्रातील रहिवाशी असणाऱ्या ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या एनएमएमटी बसचा प्रवास मोफत असेल, असे जाहीर केले आहे.

 प्रवास करण्यासाठी ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी महापालिका परिवहन उपक्रमाचे (एनएमएमटी) ओळखपत्र प्राप्त करुन घेणे गरजेचे राहील. ओळखपत्राकरिता वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्याचा पुरावा म्हणून जन्म तारखेचा दाखला अथवा पूर्ण जन्मतारीख नमूद असलेले आधारकार्ड सादर करणे आवश्यक असेल. तसेच नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रहिवास पुरावा म्हणून मालमत्ता कर त्या ज्येष्ठ नागरिकाच्या स्वतःच्या कुटुंबाच्या व्यक्तीच्या नावावर असलेले कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील. भाडेपट्टीवर राहणाऱ्या जेष्ठ नागरिकांनी घराचा करारनामा (Agreement Copy)  किंवा महापालिका हद्दीमध्ये किमान ५ वर्षे रहिवाशी असल्याचा तहसिलदाराचा दाखला सादर करणे आवश्यक असेल. अशा सर्व कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील रहिवाशी असलेल्या ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना ‘एनएमएमटी'चे ओळखपत्र प्राप्त करुन घेता येईल. त्याकरिता कागदपत्राच्या मूळ आणि दोन छायांकित प्रती तसेच पासपोर्ट आकारचे तीन फोटो सादर करणे आवश्यक राहील.

ज्येष्ठ नागरिकांप्रती असलेली आपुलकीची आणि आदराची भावना अभिव्यक्त करीत ऐन दिवाळीमध्ये ६५ वर्षावरील नवी मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांना मोफत एनएमएमटी बस प्रवासाची दिवाळी भेट देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलेला आहे. सदरचा ऐतिहासिक निर्णय महापालिकेची लोककल्याणकारी प्रतिमा उजळविणारा आहे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 खारघर टोलनाक्यावर वाहनांवर पाण्याची फवारणी