दिवाळीसणात दिवा शहरामध्ये उच्च दाबाने पाणी पुरवठा करण्याची मागणी

सणासुदीत तरी प्रशासनाने पाणी टंचाईकडे गंभीरतेने पाहावे 

ठाणे : ऐन सणासुदीच्या दिवसात दिवा विभागात भीषण पाणी टंचाई भेडसावत असल्यामुळे ठाणे महापालिका पाणी पुरवठा विभागाने सणासुदीत दिवा विभागाला उच्च दाबाने पाणी पुरवठा करावा, अशी मागणी ‘तन्वी फाऊंडेशन'च्या अध्यक्षा सौ. ज्योती राजकांत पाटील यांनी केली आहे. तर सणासुदीच्या काळात पाणी टंचाईकडे प्रशासनाने गंभीरतेने लक्ष द्यावे. पाणी टंचाईमुळे दिवा मधील महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

ऐन दिवाळी सणाच्या सुरवातीलाच दिवा शहरातील अनेक भागात पाणी टंचाई आहे. काही भागात दोन-दोन दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. दरवर्षीच्या पाणी टंचाईचे महिला वर्ग हैराण आहे. आधीच दिवाळी सणात नागरिकांचे आर्थिक बजेट वाढत असताना त्यात पाण्यावर खर्च वाढल्यास नागरिकांना आर्थिक फटका बसतो, असे ज्योती पाटील यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दिवा मध्ये नेहमी असणारी पाणी टंचाई लक्षात घ्ोऊन किमान सणासुदीच्या दिवसात तरी महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठा वाढवून उच्च दाबाने दिवा शहरात पाणी पुरवठा करावा, अशी मागणी सौ. ज्योती पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.    

ज्या भागात पाण्याच्या लाईन नादुरुस्त आहेत तिथे टँकरने पाणी द्या...
दिवा मधील ज्या भागांमध्ये पाण्याच्या पाईपलाईन नादुरुस्त आहेत किंवा अद्याप अंतर्गत पाईपलाईन पडलेले नाहीत, अशा इमारतींना आणि चाळींना महापालिकेने टँकरने पाणी पुरवठा या दिवाळी सणात करावा, अशी मागणी ज्योती पाटील यांनी केली आहे. दिवा मधील नागरिकांना प्रत्येक सणासुदीला पाण्यामुळे होणारी अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने स्वतःहून या उपायोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दिवा शहराची लोकसंख्या वाढली आहे. नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. मात्र, पाणी पुरवठा वाढविला तरीही दिव्यात पाणी टंचाई १२ महिने जाणवते. पाणी जाते कुठे? हाच संशोधनाचा प्रश्न आहे. पण, किमान सणासुदीच्या दिवसात उच्चदाबाने पाणी पुरवठा झाल्यास काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळेल. महापालिका प्रशासनाने याबाबत नियोजन करुन पाणी पुरवठा सुरळीत करावा. - ज्योती पाटील, अध्यक्षा-तन्वी फाऊंडेशन. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गायिका आर्या आंबेकरच्या सुश्राव्य सुरेल मैफिलीने सजली दिवाळी पहाट