रायगड जिल्ह्यात भात कापणी अंतिम टप्प्यात
उरण तालुवयातील शेतकरी हवालदिल
उरण : रायगड जिल्ह्यात भात कापणीला जोरदार सुरुवात झाली असून, भात कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, अजून सर्वत्र शेतमजुरांची टंचाई भासत असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. निसर्गचक्राचे बिघडलेले संतुलन आणि अवकाळी पडणारा पाऊस याची भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्यातच हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाऊ नये म्हणून,शेतकऱ्यांची भात कापणीची धावपळ सुरु आहे. परंतु,भात कापणीकरीता वेळीच मजूर मिळत नसल्यामुळे उरण तालुवयातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
दरम्यान, नाईलाजाने शेतकरी स्वतःच्याच कुटुंबातील नातेवाईकांच्या मदतीने शेतात भात कापणी करताना दिसत आहेत. उरण तालुक्यातील चिरनेर विभागात अनेक ठिकाणी आदिवासी मजुरांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. एकेकाळी भात कापणी झाल्यानंतर पिकाची कडवे चार दिवस चांगली वाळल्यानंतरच त्याचे भारे बांधून उडव्यात रचून ठेवले जात असत. त्यानंतर शेतातच खळा तयार करुन त्याचे व्यवस्थित शेनाने सारवण करुन, त्यानंतर त्या खळ्यावर मळणीची प्रक्रिया केली जात होती. परंतु, सध्याच्या लहरी पावसाच्या भीतीने वर्षभर केलेले कष्ट आणि त्यासाठी केलेला अमाप खर्च वाया जाऊ नये म्हणून शेतकरी पिके न वाळवताच आणि त्याची साठवणूक न करताच ताबडतोब कापलेले भात पीक झोडून भात घरी आणत आहेत.
उरण तालुका भाताचे कोठार समजले जात होते. परंतु, मागील काही वर्षापासून शेती आणि शेतकऱ्यांचे वेगवेगळ्या माध्यमातून नुकसान होत असल्याने तसेच येथील औद्योगिकरणामुळे शेतीतील उत्पादनावर हमखास गदा येताना दिसत आहे. पूर्वी इतके भाताचे शेतीतून विक्रमी उत्पादन होत नाही. त्यात भातशेती पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना कधी ओला दुष्काळ तर कधी सुक्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे उरण तालुक्यात अनेक ठिकाणी जमिनी लागवडी खाली न आणता त्या ओसाड ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे उरण भागात शेतीकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे भातशेतीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध होत नसल्यामुळे उरण तालुवयातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच जंगल भागात असणाऱ्या भात शेतीवर रानडुकरांची वक्रदृष्टी वळली असल्याने, भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास कळपाने पिकावर हल्ला करणारी रानडुकरे हिरावून नेत असल्याने, रानडुकरांचा वनविभागाकडून, बंदोबस्त करावा, अशी मागणी उरण परिसरातील शेतकरी करीत आहेत.