एपीएमसीत आफ्रिकन आंब्याचे आगमन
दिवाळी मुहूर्तावर आफ्रिकन मलावी हापूस आंबा दाखल
वाशी : कोकणातील हापूस आंबा मार्च मध्ये बाजारात दाखल होत असतो. मात्र, वाशीतील एपीएमसी फळ बाजारात ११ नोव्हेंबर रोजी आफ्रिकन मलावी हापूस आंबा दाखल झाला असून याची चव हापूस सारखीच आहे. बाजारात आंब्याचे ५९८ बॉक्स दाखल झाले असून प्रती बॉक्स ४५०० ते ५५०० रुपये दर आहे. यंदा उत्पादन चांगले असून आवक वाढताच दर आणखी कमी होणार असल्याची माहिती फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.
हापूस आंबा म्हटल म्हटल्यावर सर्वांसमोर कोकणचा हापस आंबा दिसतो. मात्र, हापूस आंब्याप्रमाणेच परदेशी आंबे देखील बाजारात दाखल होत असून आफ्रिकन मलावी आंब्याची पहिली खेप वाशी मधील एपीएमसी बाजारात दाखल झाली आहे. दरवर्षी कोकणातून एपीएमसी बाजारात आणि देशाच्या इतर भागात कोकणातील हापूस आंबा विक्रीसाठी येतो. तसेच परदेशात देखील हापूस आंबा पाठवला जातो. हापूस आंबा बाजारात दाखल होण्याकरिता अजून तीन ते चार महिन्यांचा कालावधी बाकी असताना वाशीतील एपीएमसी बाजारात आफ्रिकन आंब्याची आवक झाली आहे.
आफ्रिकेतीील मलावी देशात हापूस आंब्याचे उत्पादन काढण्यात आले आहे. कोकणातील हापूस आंब्याप्रमाणेच या हापूस आंब्याला चव, रंग, सुगंध असल्याने खवय्यांना सुवर्णसंधी आहे. मलावी मधील ६०० हेक्टर जमिनीवर या हापूस आंब्याची लागवड करण्यात आली आहे. १३ वर्षांपूर्वी रत्नागिरी मधून ४० हजार हापूस आंब्याच्या काड्या मलावी मध्ये नेण्यात आल्या होत्या. मलावी मधील हवामान कोकणातील हवामानासारखेच उष्ण-दमट असल्याने तिथे लागवड केलेल्या आंब्याला फळधारणा चांगली झाली असून मोठ्या प्रमाणत आंब्याचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिने आफ्रिकन हापूस एपीएमसी मध्ये आवक सुरु राहणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी ५९८ पेट्या पहिली खेप वाशी बाजारात दाखल झाली असून या आंब्याला ४५०० ते ५५००रुपये प्रति बॉक्स अशी किंमत आहे.
मागील दोन वर्षाच्या तुलनेत सदरचे दर अधिक आहेत. यंदा मलावी हापूसचे पीक चांगले आले आहे. याचा हंगाम डिसेंबर अखेरपर्यंत चालेल. तसेच २० ते २५ नोव्हेंबरपासून आवक आणखी वाढणार असल्याने दर खाली येतील. गुणवत्ता आणि चव भारतीय हापूस आंब्यासारखीच आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात मलावी आंब्याची चव चाखायला मिळणार आहे, अशी माहिती फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांनी दिली आहे.