ऐन ‘दिवाळी'त नवी मुंबई मध्ये पाणी प्रश्न एैरणीवर

 कोपरी गाव परिसरातही पाणी-बाणी?

वाशी : सारसोळे गाव सेक्टर-६ मधील काही भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. सारसोळे गाव सेक्टर-६ मध्ये पाणी पुरवठा सुरळीत करावा म्हणून वारंवार मागणी करुन देखील परिस्थिती ‘जैसे थे' आहे. त्यामुळे पाणी प्रश्नी सारसोळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून, सारसोळे मधील महिलांनी अखेर नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनाचा ताबा घेत आंदोलन केले. त्यामुळे स्वतःच्या मालकीचे धरण असून देखील नवी मुंबई मध्ये पाणी समस्या भीषण झाली असल्याचे वास्तव समोर आले आहे.

स्वतःचे मालकी धरण असलेली महापालिका म्हणून नवी मुंबई महापालिकेची ओळख आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून नवी मुंबई शहरातील बऱ्याच भागात अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नेरुळ मधील सारसोळे सेक्टर-६ भागात देखील पाणी प्रश्न एैरणीवर आला आहे. याबाबत येथील स्थानिकांनी नेरुळ विभाग कार्यालयात अनेक तक्रारी आणि पाठपुरावा करून देखील परिस्थिती ‘जैसे थे वैसे'च आहे. आता दिवाळी मध्ये देखील पाणी टंचाई जाणवत असल्याने सारसोळे गाव सेक्टर-६ येथील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे येथील संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात आंदोलन केले. यावेळी ‘पाणी द्या, पाणी द्या' अशी मागणी करत महिलांनी महापालिका आयुक्तांच्या दालनाचा ताबा घेतला.

कोपरी गाव परिसरातही पाणी-बाणी?
कोपरी गाव परिसरात दर रविवारी दिवसा पाणी पुरवठा बंद ठेवला जात होता. मात्र, मागील रविवारी २४ तास तर बुधवारी सलग २० तास पाणी बंद ठेवण्यात आले होते. याबाबत महापालिका पाणी पुरवठा विभागामार्फत कुठलीही सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे पाण्याच्या प्रतीक्षेत येथील रहिवाशांनी रात्र-रात्र जागल्यानंतर अखेर टँकर मधील पाण्यावर स्वतःची तहान भागवली. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कोपरी गाव परिसरात ‘पाणी-बाणी'ची परिस्थिती निर्माण झाल्याने येथील रहिवाशांनी नवी मुंबई महापालिका विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

घणसोली मध्ये मागील काही दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली असून, सदर पाणी टंचाई कृत्रिम असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या भागात मुबलक पाणी असले तरी वितरण व्यवस्था ढिसाळ झाल्याने टँकर मधील पाण्यावर अनेक भाग अवलंबून आहेत. टँकरच्या माध्यमातून पाणी मागवून घणसोली मधील अनेक सोसायटींचे लाखो रुपये खर्च होत आहेत.

सारसोळे गावात मागील अनेक महिन्यांपासून पाणी समस्या असून, सारसोळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वनवण करावी लागत आहे. त्यामुळे नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानुसार सुरळीत पाणी पुरवठा नाही झाला तर पुढील दिवसात आम्ही थेट महापालिका मुख्यालयातच वास्तव्य आंदोलन करुन तिथेच धुणी-भांडी करु. - मनोज मेहेर, माजी ब प्रभाग समिती सदस्य - नवी मुंबई महापालिका.

सारसोळे गावातील पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, सारसोळे सेवटर-६ येथील पाणी समस्या कायम स्वरुपी निकाली काढण्यासाठी स्वतंत्र जलकुंभ बांधण्याबाबत कार्यवाही केली जाणार आहे. - राजेश नार्वेकर, आयुक्त - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रायगड जिल्ह्यात भात कापणी अंतिम टप्प्यात