ठाणे शहरात ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' मोहिम

मोहिमेत ‘जबाबदार ठाण्याचे रुबाबदार नागरिक व्हा' संदेश प्रसारीत होणार

ठाणे : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' मोहिम ठाणे महापालिका क्षेत्रातही राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने १३ नोव्हेंबर पर्यंत स्वच्छतेचा उत्सव साजरा केला जात आहे. स्थानिक उत्पादनांची खरेदी, एकेरी वापराच्या प्लास्टिकला नकार आणि पर्यावरणपूरक दिवाळी या तीन उद्दिष्टांभोवती उपक्रमांचे आयोजन महापालिका क्षेत्रात करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियान'चा नागरी टप्पा-२ सुरु झाला आहे. त्याला राज्य सरकारने ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.०'ची जोड दिली आहे. त्यानिमित्ताने ठाणे महापालिकेने आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, पर्यावरण पूरकता आणि स्थानिक उत्पादनांना प्राधान्य याबद्दल जनजागृती मोहिम हाती घेतली आहे. ‘जबाबदार ठाण्याचे रुबाबदार नागरिक व्हा' असा संदेश या मोहिमेतून ठाणेकरांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती उपायुक्त (घनकचरा) तुषार पवार यांनी दिली.

स्वयंसहाय्यता गटांच्या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना चालना देण्यासाठी या मोहिमेत प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी एक स्टॉल महापालिका मुख्यालयात उभारण्यात आला आहे.

वापरुन जुन्या झालेल्या परंतु सुस्थिती असलेल्या वस्तुंचे संकलन महापालिका करत असून त्यासाठी विवियाना मॉल आणि ठाणे रेल्वे स्थानक येथे आरआरआर केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. या केंद्रांवर नागरिकांना सुस्थितीतील वस्तू जमा कराव्यात, त्या गरजुंपर्यत पोहोचवण्यात येणार आहेत, असे उपायुवत तुषार पवार यांनी सांगितले. सदर केंद्रांवर वस्तू जमा करणाऱ्या नागरिकांना पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्यासाठी पणती भेट देण्यात येत आहे.


शालेय विद्यार्थ्यांनीही पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याची शपथ या मोहिमेत घेतली आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या मॉलमध्ये ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी'च्या मोहिमेत सहभागी होणाऱ्या ठाणेकरांसाठी सेल्फी पॉईंटही ठेवण्यात आला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका प्रशासनाचे प्रसारमाध्यम प्रतिनिधींसमवेत दिवाळी स्नेह संमेलन