उरण बाजारपेठेत झगमगाट
‘दिवाळी'साठी दुकाने सज्ज; खरेदीसाठी लगबग
उरण : उरण शहर तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे दिवाळी सण निमित्ताने येथील बाजारपेठ फुलून गेली आहे. दुकाने आणि बाजारपेठ दिवाळी सणासाठी लागणाऱ्या वस्तूंनी सजली आहे. कंदील, पणत्या, फटाके, दिव्यांचा झगमगाट सर्वत्र दिसत आहे. यासाठी प्रत्येकाची खरेदीसाठी लगबग सुरु आहे. दरम्यान, यंदा फटाक्यांच्या किमती २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
उरण शहरात दिवाळीसाठी बाजारपेठा फुलल्या असून, खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. दिवाळी सणासाठी उरण शहर आणि परिसरातील बाजारपेठ बहरली आहे. झगमगाट करणारे आकाशकंदील, दिवे, पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. कागदी, कापडी आणि प्लास्टिकचे आकाशकंदिल बाजारात दाखल झाले आहेत.
दिवाळीनिमित्त बाजारात कंदील विक्रीसाठी दाखल झाल्याने उरण बाजारपेठ, राजपाल नाका, सेंट मेरी हायस्कूल जवळ, आनंद नगर आदी परिसर बहरला आहे. विविधरंगी सजावट केलेले आकाशकंदील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, कंदिलासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे १० ते १२ टक्क्यांनी आकाशकंदिल महागले आहेत. आकाशकंदिलांप्रमाणे चांदणी, बॉल, पॅराशूट, इको फ्रेंडली हॅण्डमेड आकाशकंदील बाजारात पाहायला मिळत आहेत.
रांगोळीचे आकर्षक स्टिकर, तयार साचे बाजारपेठेत पाहायला मिळत आहेत. शुभ लाभ, स्वस्तिक श्री, ૐ, लक्ष्मीची पावले, लक्ष्मीचे फोटो, मूर्ती, कुबेर यंत्र, छोट्या- मोठ्या आकारातील झाडू आदी साहित्य नागरिक आवर्जून खरेदी करत आहेत. याशिवाय विविध कलराची रांगोळी उपलब्ध असून, ठिक-ठिकाणी रांगोळी विक्री दुकाने थाटण्यात आली आहेत. हातगाड्यांवर मातीच्या पणत्या विकावयास आल्या आहेत.
दिवाळी सणानिमित्त सजावटीसाठी कागदी, प्लास्टिक, पीव्हीसी, मेटॅलिक, अक्रेलिकमध्ये फुलांच्या माळा उपलब्ध आहेत. चायना मेड पणत्यांपेक्षा पारंपारिक मातीच्या पणत्या खरेदी करण्याकडे नागरिकांचा जास्त कल आहे ४० रुपये ते ५० रुपये डझन या भावाने पणत्या विकतो, असे पणती विक्रेती पूजा मांडेलकर यांनीं सांगितले.
विविध आकाराचे, विविध प्रकारचे कंदील १०० रुपये पासून ५०० रुपये पर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. मोती, कुंदन, कापडी फुलांचे तोरण, टिकाऊ फुलांची माळ, मेणाचे दिवे, लायटिंग, पणत्यांनी दुकाने बहरली आहेत. फटाक्यांची दुकाने सजली असली तरी किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत २० ते ३० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
उरणमध्ये उरण शहरातील आसपासच्या गावातून नागरिक मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी येतात. त्यामुळे उरण बाजारपेठेत सर्वत्र उत्साह असतो. दिवाळी सीझनमध्ये कितीही वस्तू महाग असल्या, तरी त्या ग्राहक खरेदी करतात. त्यामुळे दिवाळी मध्ये नेहमीच बाजार तेजीत असतो. - यश मेहता, व्यापारी - उरण बाजारपेठ.