वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकाकडून विविध उपाययोजना
नवी मुंबईकरांची दिवाळी स्वच्छ, प्रदुषण मुक्त आणि सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी कटीबध्द होऊया - राजेश नार्वेकर
नवी मुंबई : नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता चांगली रहावी अशी सर्व नागरिकांची जबाबदारी असून प्रदुषण कमी करण्यासाठी नवी मुंबई महापालिका विविध उपाययोजना राबवित आहे. वायू प्रदुषणामध्ये बांधकामे करताना उडणारी धूळ एक महत्वाचा विषय असून यादृष्टीने बांधकामाशी संबधित घटकांना सतर्क करण्यासाठी महापालिका मुख्यालयात बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारद यांच्या विशेष बैठकीचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी संवाद साधताना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिकेने हवा गुणवत्तेबाबत तत्पर कार्यवाही करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती दिली. यामध्ये बांधकामांमुळे होणाऱ्या प्रदुषणाला प्रतिबंध करण्यासाठी महापालिकेने त्वरित केलेल्या कार्यवाहीविषयी त्यांनी सांगितले.
महापालिका प्रशासन तसेच बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारद यांनी एकत्र येऊन शहराचा विकास करताना शहराच्या हवा गुणवत्ता प्रमाणकाचीही काळजी घ्यावी. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बांधकाम साईटस् वरुन पुढील आदेश होईपर्यंत डेब्रीजची अजिबात वाहतूक होणार नाही, याचे काटेकोर पालन करावे. त्याचप्रमाणे साईटस्वर बांधकाम साहित्य आणणे अत्यंत गरजेचे असेल तेव्हा ते वाहन पूर्णतः झाकलेले असेल, असे निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी यावेळी दिले.
नवी मुंबई महापालिकेने मुंबई महापालिकेचा हवा गुणवत्ता नियंत्रण आराखडा अंगीकृत केला असल्याची माहिती देत आयुक्तांनी त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी आणि वास्तुविशारदांनी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच महापालिका केवळ खाजगी बांधकाम व्यावसायिकांना वायू प्रदुषण रोखण्याबाबत निर्देश देत नाही तर सोबत महापालिकेमार्फत सुरु असणाऱ्या विविध प्रकारच्या बांधकामांच्या ठिकाणीही वायू प्रदुषण होणार नाही याची दक्षता घेत असल्याचे आणि तशा प्रकारचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला दिले असल्याचे आयुक्त नार्वेकर यांनी बैठकीत स्पष्ट केले.
यावेळी वास्तुविशारद संतोष सतपथी यांनी बांधकामांमुळे होणारे वायू प्रदूषण आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, सहा.संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, ‘बिल्डर्स असोसिएशन ऑफ नवी मुंबई'चे अध्यक्ष वसंत बद्रा, ‘असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट'चे अध्यक्ष शेखर बागुल तसेच बांधकाम व्यावसायिक हितेन जैन, केतन त्रिवेदी, अनिल पटेल, लखाणी त्याचप्रमाणे वास्तुविशारद कौशल जाडिया आणि इतर बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बांधकामाच्या ठिकाणी धूळ निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे, त्यासाठी स्प्रिंकलर फवारणी करणे याबाबींची काटेकोर दक्षता घ्यावी. नवी मुंबईकरांची दिवाळी स्वच्छ, प्रदुषण मुक्त आणि सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी कटीबध्द होऊया. - राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका.