चक्रीवादळ आपत्ती निवारणासाठी जिल्हा यंत्रणा सज्ज
कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, डोंबिवली येथे रंगीत तालीम संपन्न
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा गांव आणि गोडाऊन येथे, अंबरनाथ तालुक्यातील एमआयडीसी येथील केमिकल कंपनीमध्ये तसेच कल्याण मधील मोठागाव, ठाकुर्ली येथील एमआयडीसी, डोंबिवली येथील कंपनीमध्ये चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी रंगीत तालीम झाली. महसूल, ग्रामविकास, पोलीस, आरोग्य, पाटबंधारे, अग्निशमन, औद्योगिक सुरक्षा, मत्स्य व्यवसाय विभाग, परिवहन, सार्वजनिक बांधकाम या विभागांसह आपदा मित्र, ठाणे महापालिकेचे आपत्ती निवारण दल, भारतीय तटरक्षक, मेरीटाईम, एनडीआरएफ आदि प्रमुख विभागांनी या रंगीत तालीमीत सहभाग घेऊन आपत्ती निवारणास आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले.
चक्रीवादळ आपत्ती निवारण विषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे तसेच ‘आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन संबंधित विभागांना या रंगीत तालीमीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून जिल्हा कमांड अँड कंट्रोल रुमसह तीनही तालुक्यातील कंट्रोल रुममध्ये आपत्ती निवारणासाठी सज्जता ठेवण्यात आली होती. तसेच चक्री वादळाची सूचना मिळताच आणि संबंधित ठिकाणी आपत्ती आल्याची सूचना मिळताच आपत्ती निवारण दल, आपदा मित्र तसेच ठाणे आपत्ती निवारण दलाचे जवानांसह आरोग्य, महसूल यासह इतर यंत्रणांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य सुरु केले. या कालावधीत केमिकल कंपन्यांच्या परिसरातील नागरिकांना धोक्याची सूचना देणे आणि आवश्यक असल्यास त्यांचे स्थलांतर करणे, घटनास्थळावरील आपदग्रस्तांना जखमींना प्रथमोपचार करुन रुग्णालयात नेणे, रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणे आणि रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करणे आदि प्रात्याक्षिके विविध विभागांनी रंगीत तालमीत सादर केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात निवासी उपजिल्हाधिकारी तथा ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार संजय भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहून समन्वय साधत होते. तर भिवंडी येथील पडघा गांव या आपत्तीस्थळावर तहसीलदार अधिक पाटील, अंबरनाथ येथील आपत्ती स्थळी तहसीलदार प्रशांती माने आणि कल्याण येथील आपत्तीस्थळी तहसीलदार जयराज देशमुख स्वतः उपस्थित राहून बचाव कार्याच्या प्रात्यक्षिकात सहभागी झाले होते.