महापालिकेचे भविष्यातील ‘जलनियोजन'चे लक्ष
सन २०५० मधील लोकसंख्येकरिता पाणी पुरवठ्याविषयी साकल्याने विचार
नवी मुंबई : स्वतःच्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे नवी मुंबई जलसंपन्न शहर म्हणून ओळखले जाते. सदरची ओळख कायम राखण्यासाठी शहराचा झपाट्याने होत असलेला विकास लक्षात घेत दूरदृष्टीचा विचार करीत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन जलनियोजन करण्यात येत आहे. यादृष्टीने नवीन जलस्त्रोत शोधण्याकरिता या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची विशेष समिती गठीत करण्यात आली असून या ‘समिती'ची दुसरी बैठक आयुक्त दालनात पार पडली.
या बैठकीमध्ये जून २०२३ मध्ये झालेल्या पहिल्या बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन करण्यात आले. त्या बैठकीत समिती सदस्यांनी केलेल्या सूचनांनुसार संकलित केलेल्या माहितीचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये नवी मुंबई महापालिकेची पाणी पुरवठा सद्यस्थिती जाणून घेण्यात आली. तसेच सन २०५० मधील नवी मुंबई महापालिका क्षेत्राची लोकसंख्या विचारात घेऊन आवश्यक पाणी पुरवठ्याविषयी साकल्याने विचार करण्यात आला.
या दरम्यान झालेल्या सांगोपांग चर्चेमध्ये तज्ञ समिती सदस्यांनी आपापली मते व्यक्त केली. त्यावर सविस्तर चर्चा झाल्यावर आयुक्तांनी मौलिक सूचना केल्या. या दरम्यान नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विकास आणि त्यामुळे वाढणारी लोकसंख्या विचारात घेण्यात आली. त्यासोबतच भविष्यात महापालिका क्षेत्रात समाविष्ट होऊ घातलेल्या ठाणे जिल्ह्यातील १४ गावांचा होणारा विकास आणि त्या भागातील आगामी लोकसंख्येसाठी आवश्यक असणारे पाणीसुध्दा विचारात घ्यावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
त्यासोबतच ‘सिडको'ने विकसित केलेले नवी मुंबई महापालिका आणि पनवेल महापालिका क्षेत्र तसेच सिडको विकसित इतर भाग या ठिकाणचा आगामी विकास लक्षात घेऊन या सर्व क्षेत्रातील लोकसंख्येला आवश्यक असणारी पाण्याची गरज लक्षात घेता या सर्व क्षेत्रासाठी एकत्रित प्रस्ताव तयार करता येईल काय? याबाबत तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्या सोबतच आवश्यक पाणी पुरवठा उपलब्ध होऊ शकेल अशा शाश्वत जलस्त्रोताबाबत शोध घेण्याचे आणि त्यादृष्टीने चाचपणी करण्याचे सूचित करण्यात आले.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या विशेष बैठकीप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील तसेच पाणी पुरवठा क्षेत्रातील अनुभवसंपन्न समिती सदस्य ‘व्हीजेटीआय-मुंबई'चे निवृत्त प्राध्यापक डॉ. पी. पी. भावे, ‘आयआयटी'चे प्राध्यापक डॉ. ज्योती प्रकाश, ‘महाराष्ट्र जीवन प्राधिकरण'चे निवृत्त मुख्य अभियंता मिलींद केळकर, महापालिकेचे निवृत्त शहर अभियंता मोहन डगावकर, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, सुभाष सोनावणे प्रत्यक्ष उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाचे निवृत्त मुख्य अभियंता सु. श. वाघमारे ऑनलाईन बैठकीस उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिका नागरिकांना सद्यस्थितीत उपलब्ध करुन देत असलेले दैनंदिन पाणी इतर शहरांच्या तुलनेत प्रतीमाणसी अधिक असून त्यामुळे पाण्याचा अनाठायी वापर होऊ नये याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे सदर बैठकीत सदस्यांमार्फत स्पष्ट करण्यात आले.
भिरा येथील जलविद्युत प्रकल्पातून कुंडलिका नदीत सोडण्यात येणारे पाणी शहरांतील नागरिकांसाठी वापरात आणण्याकरिता सिडको, पनवेल महापालिका आणि नवी मुंबई महापालिका यांनी एकत्र येऊन शासनाकडे संयुक्तपणे प्रस्ताव सादर करण्याबाबत सदर बैठकीत विचारविनीमय करण्यात आला.
पाताळगंगा नदीमध्ये टाटा पॉवर यांच्या मार्फत वीज निर्मिती केल्यानंतर सोडून देण्यात येणाऱ्या पाण्यामधून १०० द.ल.लि. पाणी खोपोली येथून भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रामध्ये आणण्याबाबत आवश्यक अशा पर्यायांचा सर्वांगीण अभ्यास करुन त्याचा तांत्रिक अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच पाताळगंगा नदीतील उपलब्ध पाण्यासाठी इतर संस्थांनी केलेले आरक्षण वापरात नसल्यास नवी मुंबई महापालिका मार्फत सदर पाण्याच्या आरक्षणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याविषयी पर्यायही विचारात घेण्यात आला. या व्यतिरिक्त कुंडलिका नदीवरुन पर्यायी शाश्वत स्त्रोताबाबत प्राथमिक अहवाल तयार करण्याच्या सूचना बैठकीतील विचारविनीमय अंती देण्यात आल्या.
जल क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींच्या सदर समितीने नवी मुंबई महापालिका अशाप्रकारे पाणी पुरवठा विषयक भविष्याचे आगाऊ नियोजन करीत असल्याची अतिशय उत्तम बाब असल्याचे अभिप्राय दिले. त्यामुळे सविस्तर विचार केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या विविध पर्यायांचा उपयोग नवी मुंबई शहराच्या भविष्यातील जल नियोजनासाठी होईल, असा विश्वास आहे.
- राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका.