कोपरी गाव मधील वायू प्रदूषणाची महापालिका द्वारे दखल
‘स्वच्छ हवा, माझा अधिकार' जन आंदोलन कायम
वाशी : वाशी सेक्टर-२६ कोपरी गाव परिसरात वायू प्रदूषण वाढत आहे. या विरोधात येथील स्थानिकांनी ‘स्वच्छ हवा, माझा अधिकार' या मोहिमेअंतर्गत आंदोलन सुरु ठेवले आहे. या आंदोलनाची दखल आता नवी मुंबई महापालिकेने घेतली असून, कोपरी गाव परिसरातील वाढत्या प्रदूषणावर ठोस कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका अतिरिक्त शहर अभियंता तसेच पर्यावरण प्रमुख शिरीष आरदवाड यांनी ‘नवी मुंबई विकास अधिष्ठान'चे अध्यक्ष संकेत डोके आणि शिष्टमंडळाला दिले.
मुंबई परिसरात हवेची गुणवत्ता ढासळून वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. या प्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली असून, स्वतः सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान प्रदूषणावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, वाशी कोपरी गाव सेक्टर-२६ परिसरात मागील अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. याबाबत महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळाकडे कोपरी गाव येथील रहिवाशांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त नोटीसींचा फार्स राबवून प्रदूषण करणाऱ्या रासायनिक कारखान्यांना अप्रत्यक्ष पाठीशी घालत आहे. त्यामुळे कोपरी गाव येथील वायू प्रदूषणावर कायमस्वरुपी तोडगा काढावा म्हणून येथील रहिवाशांनी ‘नवी मुंबई विकास अधिष्ठान'च्या माध्यमातून ‘स्वच्छ हवा, माझा अधिकार' या शिर्षकांतर्गत जनआंदोलन छेडले आहे. या जनआंदोलनाची दखल आता नवी मुंबई महापालिकेने घेतली असून, वायू प्रदूषणावर ठोस कारवाई करण्याचे आश्वासन महापालिका अतिरिक्त शहर अभियंता तसेच पर्यावरण प्रमुख शिरीष आरदवाड यांनी दिले आहे.
यावेळी शिरीष आरदवाड यांनी कोपरी गाव येथील प्रदूषणाची माहिती घेतली. त्यानंतर, एपीएमसी आणि कोपरी गाव परिसर येथे किमान चार धुळक्षमण यंत्र कायमस्वरुपी बसवण्यात येतील तसेच कोपरी पुलाखाली रेल्वे रुळाशेजारी रेल्वेकडून सुरु असलेल्या खडी साठवणूक डेपोवर संबंधित रेल्वे विभागाशी चर्चा करुन तातडीने उपाययोजना करण्यात येईल, सोबतच कोपरी गाव आणि कोपरखैरणे सेक्टर-११ शेजारील नाल्यात समावेश होणारे दुर्गंधीयुक्त सांडपाणी रोखण्यासाठी झोपडपट्टी भागातील मलःनिसारण प्रक्रिया केंद्रावर विशेष लक्ष देण्यात येईल आणि येणाऱ्या काळात नागरिकांबरोबर हातात हात मिळवून प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन शिरीष आरदवाड यांनी दिले.
दरम्यान, जोपर्यंत कोपरी गाव परिसरातील वायू प्रदूषण कमी होत नाही तोपर्यंत ‘स्वच्छ हवा, माझा अधिकार' या मोहिमेअंतर्गत जन आंदोलन सुरु ठेवणार असल्याचा इशारा शिष्टमंडळाने दिला. याप्रसंगी ‘नवी मुंबई विकास अधिष्ठान'चे अध्यक्ष संकेत डोके, बाळासाहेब माने, डॉ. अन्सारी, अशरफ शेख, प्रोफेसर विनील सिंग, दिप्ती घाडगे आदी उपस्थित होते.