धुरीकरण करुनही डास संख्येत वाढ; औषधांच्या परिणामतेबाबत साशंकता
‘मनसे' तर्फे महापालिका वैद्यकिय अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका तर्फे धुरीकरण करण्यासाठी वापरण्यासाठी येत असलेल्या औषधांच्या दर्जाबाबत ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'च्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या सानपाडा येथील नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. महेश चव्हाण यांना ९ नोव्हेंबर २०२३ रोजी चांगलेच धारेवर धरले. या शिष्टमंडळात ‘मनसे'चे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे, विभाग अध्यक्ष युवराज मनसुख, शाखा अध्यक्ष संजय कदम, शाखा अध्यक्ष मंगेश संभेराव, मनसैनिक शशिकांत गायकवाड यांचा समावेश होता.
नवी मुंबई महापालिका नवनवे प्रयोग करण्यात आणि योजना राबविण्यात अग्रेसर राहिलेली आहे. मात्र, नागरिकांच्या रोजच्या जगण्याचा तितकाच धोकादायक भाग असलेल्या डासांचा त्रास रोखण्यास महापालिका अद्याप गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. महापालिका नवी मुंबई शहरात धूर फवारणी करत असल्याचा दावा करत असली तरी सानपाडा विभागात डासांना कितपत प्रतिबंध बसला याबाबत साशंकता आहे. डास मारणारी आयुधे नाहीत, असे एकही घर सानपाडा विभागात सापडणार नाही. यातून महापालिकेला डासमुक्त नवी मुंबई शहर करण्यात किंवा डासांचे प्रमाण कमी करण्यात अपयश येऊ लागल्याचे सिध्द होत आहे. हवा प्रदूषित झाल्याने आजारांस सामोरे जावे लागणाऱ्या सानपाडा विभागातील नागरिकांना डासांपासून उद्भवणाऱ्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. डेंग्यू, मलेरिया आजाराने देखील कहर केला असून, यावर्षी डेंग्यू, मलेरिया आजाराचे सर्वाधिक रुग्ण नवी मुंबई शहरात सापडल्याची नोंद आहे, असे ‘मनसे'चे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी डॉ. महेश चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात निदर्शनास आणले आहे.
नवी मुंबई शहराला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. त्यात नवी मुंबई शहरात देखील नाले, होल्डिंग पाँड आहेत. त्याभोवती खारफुटी देखील अधिक आहे. विकासाच्या बाबतीत उच्चांक गाठलेल्या नवी मुंबई शहरातील सानपाडा विभागात नवनवीन विकासकामे सुरु आहेत. या बांधकामांमुळे साठत असलेल्या पाण्यामुळे डासांची संख्या वाढली आहे. त्यात खाडीकिनारी वसलेल्या भागात कांदळवनांमुळे नागरिकांना तर डासांच्या भीतीने सायंकाळीच आपली दारे, खिडक्या बंद करुन घ्यावी लागत आहेत. धूर फवारणी करण्यासाठी अनेकदा तक्रारी येत असल्याने आरोग्य विभागाकडे मागणी वाढू लागली आहे. मात्र, महापालिकेकडून धुरीकरण सुरु असल्याचे उत्तर वारंवार दिले जात आहे. परंतु, धुरीकरण सध्या वरवर लावण्यात येणारा तकलादू लेप ठरु लागले आहे. धुरीकरणासाठी वापरण्यात येत असलेली औषधे किती परिणामकारक आहेत याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. मुख्य म्हणजे धुरीकरण केल्यावर देखील डास उडताना दिसत असल्याने औषधांच्या निष्क्रियतेवर शिक्कामोर्तब होऊ लागले आहे. त्यामुळे महापालिका धुरीकरणासाठी परिणामकारक औषधे वापरते का?, की कंत्राटदारांच्या घशात महापालिकेचा पैसा जात आहे?, असा प्रश्न ‘मनसे'चे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, महापालिकेच्या हलगर्जीपणाचा फटका थेट नागरिकांना बसू लागला आहे. नागरिक डासांच्या वाढत्या प्रमाणाने त्रासले आहेत. त्यामुळे सानपाडा विभागात धुरीकरण करत असलेल्या औषधांचा दर्जा तपासून त्याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल येत्या ७ दिवसांत लेखी स्वरुपात देण्याची मागणी ‘मनसे'चे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी यावेळी केली. अन्यथा महापालिका आरोग्य विभागाच्या विरोधात ‘मनसे स्टाईल' ने आंदोलन करण्याचा इशाराही योगेश शेटे यांनी यावेळी दिला.