उरण लोकलला आजही रेड सिग्नल
लोकलसाठी उरणकरांची प्रतिक्षा कधी संपुष्टात येणार?
नवी मुंबई : आगीन्गाडीसाठी उरणकरांची गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रतिक्षा कधी संपुष्टात येणार? याची अनिश्चितता आजही कायम आहे. अंतिम चाचणीनंतर जवळपास आठ महिन्यांपासून उद्घाटनाअभावी प्रवासी सेवेत येऊ न शकलेल्या उरण ते नेरुळ-बेलापूर मार्गावर यापूर्वी गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, दसरा सणाच्या मुहूर्तावर लोकल सुरु होणार असल्याचे बोलले जात होते. त्याअनुषंगाने रेल्वे प्रशासनाने उद्घाटनाची वेळोवेळी तयारी देखील केली होती. पण, पंतप्रधान कार्यालयाकडून उद्घाटनासाठी ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने उरण-नेरुळ लोकलला सध्याही रेड सिग्नलच देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक तारखा आणि मुहूर्त टळल्यानंतर सर्वात मोठा सण दिवाळी मध्ये देखील उरण लोकल सुरु होण्याची शवयता धूसर झाली आहे. परिणामी, उरणकरांना पुन्हा एकदा लोकल सुरु होण्यासाठी प्रतिक्षाच करावी लागणार आहे.
‘मध्य रेल्वे'च्या महत्त्वाच्या प्रकल्पात बेलापूर-खारकोपर-उरण मार्गाचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे महामुंबईतील नवी शहरे लोकलच्या टप्प्यात येणार आहेत. खारकोपर आणि उरण दरम्यान लोकल सुरु करण्यासाठी ‘रेल्वे बोर्ड'ने आठ महिन्यांपूर्वी मंजुरी दिली आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सदर मार्ग सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतर ‘रेल्वे बोर्ड'ने मंजुरी दिली आहे. ‘मध्य रेल्वे'च्या अखत्यारीत उरण मार्गावर लोकल सेवा धावणार आहे. नुकतीच २६ ऑवटोबर रोजी ‘मध्य रेल्वे'च्या उपमहाव्यवस्थापकांनी देखील या मार्गाची अंतिम पाहणी केली आहे.
नेरुळ ते उरण लोकल मार्गावरील उरण ते खारकोपर दरम्यान दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील अपूर्ण असलेल्या रेल्वेच्या कामांनाही वेग घेतला आहे. उरणसह मार्गावरील सर्व रेल्वे स्थानकामधील विद्युत यंत्रणेची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे स्थानकांच्या परिसरातील कामे देखील युध्दपातळीवर सुरु आहेत. स्थानकांच्या सफाईची कामे सुरु असून सूचना फलक, टाईम बोर्ड आदिंचीही तपासणी सुरु आहे. उरण मार्गावरील नेरुळ ते खारकोपर दरम्यानच्या तरघर तर खारकोपर ते उरण दरम्यानचे गव्हाण स्थानकातील छताचे काम पूर्ण होत आले असून उर्वरित काम फेब्रुवारी २०२४ मध्ये कामे पूर्ण होणार आहेत, अशी माहिती रेल्वे सुत्रांकडून मिळाली.
दरम्यान, गेल्या आठ महिन्यात अनेक सणांवेळी उरण मधील प्रवासी जनतेच्या लोकल सेवा सुरु होण्याच्या आशा पल्लवित झाल्या; पण त्या वेळोवेळी फोल ठरत आहेत. रेल्वे मंत्रालयाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेरुळ-उरण लोकलला हिरवा झेंडा दाखवायचा आहे. पण, पंतप्रधानांना उद्घाटनासाठी वेळच मिळत नसल्याने रेल्वे प्रशासनाला उरण लोकलसाठी उद्घाटनाचा मुहूर्त सापडत नसल्याने उरणकरांना लोकलची प्रतिक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.