ठाण्यातील महिलांनी साजरी केली जलदिवाळी

ठाणे महानगरपालिकेच्या टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्राला दिली भेट

 ठाणे   : शहरात येण्यापूर्वी पाण्याचा प्रवास कसा होतो, त्याचे शुद्धिकरण कसे केले जाते हे जाणून घेण्यासाठी ठाण्यातील महिलांनी मंगळवारी ठाणे महानगरपालिकेच्या टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अमृत २.० या उपक्रमांर्तगत या जल दिवाळीचे आयोजन करण्यात आले होते.

सात ते नऊ नोव्हेंबर या काळात देशभरात जल दिवाळी हा उपक्रम साजरा केला जात आहे.  त्यात राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या सहकार्याने पाण्यासाठी महिला व महिलांसाठी पाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने, ठाणे महापालिकेचा समाजविकास विभाग आणि पाणी पुरवठा विभाग यांनी महिलांना पाणी पुरवठा, जल शुद्धीकरण याची माहिती देण्यासाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

स्वयंसहायता महिला बचत गटातील ३४ महिला या दिवसभराच्या पाहणी दौऱ्यात सहभागी झाल्या होत्या. टेमघर येथे पहिल्या सत्रात कार्यकारी अभियंता हनुमंत पांडे यांनी जलशुद्धीकरण केंद्र, त्याचे कामकाज, विविध विभाग यांची माहिती दिली. तर, दुसऱ्या सत्रात, कनिष्ठ अभियंता शार्दुल म्हात्रे आणि वनराज पाटील यांनी या महिलांना संपूर्ण जलशुद्धीकरण केंद्र दाखवले. पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया समजावून सांगितली.

 या पाहणी दौऱ्यात उपायुक्त वर्षा दिक्षित, उपनगर अभियंता विनोद पवार तसेच समाज विकास विभाग आणि पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पाण्याचा प्रवास, त्याचे शुद्धीकरण आणि ते करण्यासाठी लागणारे श्रम यांची माहिती जाणून घेता आली, याबद्दल महिलांनी समाधान व्यक्त केले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 सिडको कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये बोनस