सिडको महामंडळाचा सदनिकाधारकांसाठी निर्णय

सिडको महागृहनिर्माण योजना २०१८-१९ मधील थकबाकीदारांना हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ

नवी मुंबई : महागृहनिर्माण योजना २०१८-१९ मधील सदनिकेच्या हप्त्यांचा भरणा न केलेल्या अर्जदारांना सदनिकेची संपूर्ण रक्कम भरण्याकरिता येत्या १० जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला आहे. अर्जदारांनी केलेल्या विनंतीवरुन ‘सिडको'तर्फे सदर मुदतवाढ देण्यात आली आहे.

सिडको महागृहनिर्माण योजनेंतर्गत २०१८-२०१९ दरम्यान विविध प्रवर्गांकरिता सदनिकेच्या सोडती काढण्यात आल्या होत्या. सदर सोडतीमधील सदनिका या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. नवी मुंबईतील तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी या ५ नोडस्‌ मध्ये सदर गृहनिर्माण योजनेतील सदनिका साकारण्यात आल्या आहेत.

या सोडतीमध्ये कागदपत्रांच्या छाननीअंती पात्र ठरलेल्या अर्जदारांना (९ सप्टेंबर २०१९ ते २१ फेब्रुवारी २०२२ दरम्यान) वाटपपत्रे देण्यात आली होती. या वाटपपत्रांमध्ये, अर्जदारांना सदनिकेपोटी भरणा करावयाच्या रकमेच्या हप्त्यांचे वेळापत्रक नमूद करण्यात आले होते. त्यानुसार काही अर्जदारांनी एकूण हप्त्यांपैकी काही हप्त्यांचा भरणा केलेला आहे आणि काही अर्जदारांनी आजतागयत एकाही हप्त्याचा भरणा न केल्याचे आढळून आले आहे. असे अर्जदार कायद्यानुसार वाटपपत्र रद्द करण्यास पात्र ठरतात.

तरीही यापैकी काही अर्जदारांकडून हप्त्यांचा भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात. यावी अशी विनंती वारंवार ‘सिडको'कडे करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ‘सिडको'कडून ३० एप्रिल २०२३ पर्यंत हप्त्यापोटी शिल्लक रवकमेचा भरणा करण्याकरिता विलंबशुल्कात सवलत देण्याबाबतची अभय योजना राबविण्यात आली होती. परंतु, या योजनेचा लाभ काही अर्जदार त्यांच्या विविध अडचणी, कारणांमुळे घेऊ शकले नसल्यामुळे त्यांनी याकरिता मुदतवाढ देण्याची विनंती ‘सिडको'ेकडे केली होती. त्यानुसार ९ सप्टेंबर २०१९ ते २१ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत वाटपपत्रे देण्यात आलेल्या अर्जदारांपैकी जे अर्जदार थकबाकीदार Defaulter) आहेत, त्यांच्यासाठी अंतिम संधी म्हणून १० जानेवारी २०२४ पर्यंत विलंब शुल्कासह उर्वरित सर्व हप्त्यांचा भरणा करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने अशा सर्व थकबाकीदार अर्जदारांनी या अंतिम संधीचा लाभ घेऊन सदनिकेच्या संपूर्ण रवकमेचा (विलंब शुल्कासह) ‘सिडको'कडे भरणा करावा. या कालावधीत जे अर्जदार संपूर्ण रवकमेचा भरणा करण्यास असमर्थ ठरतील, अशा थकबाकीदार अर्जदारांची वाटपपत्रे रद्द करण्यात येऊन नियमानुसार त्यांची अनामत रक्कम EMD) जप्त (Forfeit) करण्यात येईल. तसेच हप्त्यापोटी भरलेल्या रकमेपैकी १० टक्के रक्कम कापून उर्वरित रवकमेचा परतावा अर्जदारांच्या बँक खात्यात करण्यात येईल.

प्रत्येक सामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे असा प्रयत्न नेहमीच सुरु असतो. याच अनुषंगाने ‘सिडको'च्या २०१८-१९ महागृहनिर्माण योजनेमध्ये जे अर्जदार पात्र असून देखील हप्ते भरु शकले नाहीत, त्यांना दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सदरची सुवर्णसंधी उपलब्ध करुन दिल्याने त्यांचा आनंद द्विगुणित होईल यात शंका नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे मी आवाहन करतो. -ना. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

‘सिडको'च्या २०१८-१९ महागृहनिर्माण योजनेतील पात्र अर्जदारांनी वेळोवेळी केलेल्या विनंतीचा विचार करुन, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार अशा पात्र अर्जदारांना पुन्हा एक अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याने निश्चितच आणखीन अनेक नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. -अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 हरित दिवाळी साजरी करा