‘आदिवासी भवन'चे महापालिका आयुक्त नार्वेकर यांच्या हस्ते लोकार्पण
आदिवासी समाजाला आपले हक्काचे व्यासपीठ उपलब्ध - आ.मंदाताई म्हात्रे
नवी मुंबई : नागर संस्कृतीपासून दूर आणि अलिप्त राहिलेले मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासी बांधव असे सामान्यप्रमाणे म्हणता येईल. सर्वसाधारणपणे जंगलात, दुर्गम दऱ्या-खोऱ्यात आणि संस्कृत समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात ते तुरळक वस्ती करुन राहतात. नागर संस्कृतीचा त्याप्रमाणे वर्गश्रेणीबध्द समाजाचा संपर्क न झालेल्या वैशिष्टयपूर्ण चालीरिती किंवा संस्कृती आदिवासींमध्ये आढळतात. परंतु, सीबीडी येथील आदिवासी बांधवांना आपली संस्कृती जपत आपले सांस्कृतिक कार्यक्रम कायम करता यावेत यासाठी
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या विकास निधीमधून सीबीडी, सेवटर-८ मधील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, भूखंड क्र.१३ वर ‘आदिवासी भवन'ची उभारणी करण्यात आली आहे. या वास्तुचे लोकार्पण ४ नोव्हेंबर रोजी आ. मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
आदिवासी बांधवांकरिता माझ्या आमदार निधीमधून २५ लाखांंचा निधी उपलब्ध करुन ‘आदिवासी भवन' उभारले आहे. आदिवासी बांधवांची लोककला आणि संस्कृती टिकावी यासाठी उभारण्यात आलेल्या या ‘आदिवासी भवन'मुळे आदिवासी समाजाला आपले हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. यातून आदिवासी समाजाची संस्कृती टिकावी आणि येणाऱ्या पिढ्यांना कळावी हाच मुख्य हेतू आहे. आज या भवनाचे लोकार्पण करताना खऱ्या अर्थाने बेलापूर पट्टीतील आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. तसेच उद्घाटन प्रसंगी आदिवासी जीवनशैलीतील नृत्य आणि लोकनृत्याचा अनोखा संग्राम जपत कमल आनंद कला मंच आणि आशिमिक कामठे प्रस्तुत ‘वारसा माझ्या महाराष्ट्राचा' या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सीबीडी येथील सेक्टर-८ मध्ये आदिवासी बांधवांकरिता ‘आदिवासी भवन' उभारुन दिल्याबद्दल आदिवासी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य (नवी मुंबईच्या) वतीने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचे आभार मानत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी नगरसेवक साबू डॅनियल, अशोक गुरखे, दिपक पवार, सुनिल पाटील, काशिनाथ पाटील, माजी नगरसेविका राधा ठाकूर, सुरेखा नरबागे, राजेश रॉय, समाजसेवक पांडुरंग आमले, भूषण ठाकूर, ॲड. सुहास वेखंडे, ॲड. संतोष पळसकर, जग्गनाथ जगताप, संजय ओबेरॉय, रवी ठाकूर, प्रभाकर कांबळे, सुभाष गायकवाड, चंद्रकांत पाटील, सुधाकर सोनावणे, नारायण मार्के, चंद्रकांत कोळी, मोहन मुकादम, मनोज भगत, प्रकाश मुकादम, आरती राऊल, शितल जगदाळे, अलका कामत, सुरेखा बामणकर, ममता सिंग, स्मिता सावंत तसेच महापालिका अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, उपायुक्त (समाजविकास) श्रीराम पवार, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, संजीव पाटील (विद्युत विभाग), उप अभियांत्रिकी अजय पाटील तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बेलापूर क्षेत्रातील सीबीडी, सेक्टर-८ मधील आदिवासी बांधवांना त्यांचे पारंपारिक कार्यक्रम साजरे करण्याकरिता, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, शिक्षणासाठी जागा उपलब्ध व्हावी, त्यांच्याकडे असणारी हस्तकला, वेगवेगळ्या महिला बचत गटांतून करणारे काम, मुलींना प्रशिक्षण आदि सर्व नवी मुंबई महापालिका उपलब्ध करुन देणार असून यासाठी ‘आदिवासी भवन'चा उपयोग होणार आहे. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.