नवी मुंबई महापालिकेची ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' मोहीम

दीपावली कालावधीत लोकसहभागातून राबविणार स्वच्छता अभियान

नवी मुंबई : स्वच्छता आणि सुशोभिकरणामध्ये आघाडीवर असणारे शहर नवी मुंबईची ओळख असून ती सातत्यपूर्ण कामांमुळेच दृढ झालेली आहे. दिवाळी या देशातील सर्वात मोठ्या सणाच्या अनुषंगाने केंद्र सरकारच्या ‘गृहनिर्माण-शहरी व्यवहार मंत्रालय'च्या सहसचिव तथा ‘स्वच्छ भारत मिशन'च्या संचालक रुपा मिश्रा यांनी राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या वेबसंवादामध्ये ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' अशी नवी मोहीम दीपावली कालावधीत राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महापालिकेने त्वरित नियोजन करीत प्राप्त सुचनांच्या अनुषंगाने दिवाळी कालावधीच्या आधीपासूनच विविध उपक्रम राबविण्याच्या अंमलबजावणीस सुरुवात केलेली आहे.

‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' मोहीम राबविताना स्वच्छतेमधील अत्यंत महत्वाचा म्हणजे स्वच्छतेची प्रत्यक्ष कृती करणारा घटक अर्थात स्वच्छतामित्रांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना मास्क वितरित करण्याचे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार  आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते सफाईकर्मींना प्रातिनिधिक स्वरुपात मास्क वितरण करून या कार्यवाहीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी आयुक्तांनी काम करताना मास्कचा वापर करण्याचे आवाहन स्वच्छताकर्मींना केले. याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तथा ‘स्वच्छ भारत मिशन'चे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय गडदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. सर्व सफाईकर्मींना मास्क वितरित केले जात आहेत.

त्याचप्रमाणे दिवाळीपूर्वी आपल्या घराची साफसफाई करताना नागरिकांनी आपल्याला नको असलेल्या, टाकून देणार आहात अशा वस्तू नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ९२ ठिकाणी उभारलेल्या ‘थ्री आर' सेंटरमध्ये आणून ठेवाव्यात. जेणेकरुन त्या गरजुंपर्यंत पोहोचून त्यांची दिवाळी आनंदात जाईल, असे आवाहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' मोहिमेअंतर्गत शासनामार्फत प्राप्त सूचनांनुसार महापालिकेच्या वतीने लोकसहभागातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये दिवाळी स्वाक्षरी मोहीम, प्लास्टिक प्रतिबंध आणि पर्यायी कापडी पिशव्या वापरण्याविषयी व्यापक जनजागृती, इकोफ्रेंडली लोकल प्रॉडक्टस्‌चा वापर असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याबाबतचे नियोजन महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आले असून नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन ‘स्वच्छता हीच लक्ष्मी' अशी आपली भारतीय परंपरेची शिकवण लक्षात घेऊन शहर स्वच्छतेत योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. - राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेलमध्ये जाई फाऊंडेशन आणि शब्दवेल यांचे एक दिवसीय साहित्य संमेलन साजरे ​​​​​​​