शांतिवन येथे मिठाईसह जीवनावश्यक चीजवस्तूंचे वाटप व ब्रेल लिपीतील पुस्तक प्रकाशन

शांतीवनच्या न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी प्रशिक्षण केंद्र सभागृहात ब्रेल लिपीतील पुस्तके प्रकाशित

पनवेल : श्री गजानन महाराज भक्त मंडळ-वाशी आणि युथ कौन्सिल-नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने ५ नोव्हेंबर रोजी पनवेल मधील शांतीवन-नेरे येथे असणाऱ्या कुष्ठरोग निवारण समितीच्या केंद्रामधील रुग्णांसाठी दिवाळीनिमित्त मिठाई, फराळ, उपचारांसाठी आवश्यक चीजवस्तूंचे वाटप करुन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात आले. यावेळी दै. ‘आपलं नवे शहर'चे उपसंपादक राजेंद्र घरत यांचे ब्रेल लिपीतील एकविसावे पुस्तक ‘एक एक करुन हात सुटताना' आणि नवी मुंबई महापालिका सचिव सौ. चित्रा बाविस्कर यांचे ब्रेल लिपीतील नववे पुस्तक ‘कडधान्य, डाळी : पोषण मूल्यांचे समृध्द स्त्रोत' यांचेही प्रकाशन तेथील न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक व गजलकार ए.के.शेख यांच्या हस्ते  करण्यात आले.

याप्रसंगी विचारमंचावर आर. सी. एफ. सेवानिवृत्तांच्या संस्थेचे अध्यक्ष व्ही. डी.पाटील, ज्येष्ठ नागरिक संघ-नेरुळचे उपाध्यक्ष प्रभाकर गुमास्ते, कुष्ठरोग निवारण समितीचे सचिव विनायक शिंदे, पुस्तकांचे लेखक राजेंद्र घरत आणि चित्रा बाविस्कर उपस्थित होते. यावेळी बोलताना साहित्यिक ए.के. शेख यांनी आपल्या पोस्ट खात्यातील आठवणींना उजाळा दिला व ब्रेल लिपीप्रमाणेच पोस्टात टेलिग्रामकरिता मोर्स्ट लिपी उपयोगात आणली जायची असे सांगतानाच आपले एक गीत ‘नॅब' या अंधांकरिता काम करणाऱ्या संस्थेचे बोधगीत म्हणून स्विकारले गेले असल्याची माहिती दिली. प्रकाशित झालेल्या ब्रेल लिपीतील दोन्ही पुस्तकांच्या लेखकांबद्दल यावेळी शेख यांनी कौतुकोद्‌गार काढले आणि श्रोत्यांमधून फर्माईश झाल्यानंतर आपल्या काही गजला आणि गीते सुरात सादर केली. ज्येष्ठ नागरिक संघाच्या वाचनालयास आपण आपली विविध पुस्तकेही भेटीदाखल देत असल्याची घोषणा शेख यांनी यावेळी केली. प्रभाकर गुमास्ते यांनी या कुष्ठरोग्यांकरिता असलेल्या आश्रमात अंध मुलांसाठी स्पर्शाने वाचण्याच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले जात आहे यातून या पुस्तकांचे लेखक व आयोजक यांचा नियतीने अन्याय केलेल्यांंप्रतिचा संवेदनशील दृष्टीकोन अधोरेखित झाल्याचे आपल्या भाषणांत नमूद केले. व्ही.डी. पाटील, पुस्तकांचे लेखक राजेंद्र घरत आणि सौ. चित्रा बाविस्कर यांचीही यावेळी समयोचित भाषणे पार पडली. युथ कौन्सिलचे सचिव सुभाष हांडेदेशमुख यांनी प्रास्तविक आणि सूत्रसंचालनाची बाजू नेटकेपणाने सांभाळली. श्री गजानन महाराज भक्त मंडळाच्या शिवाजी शिंदे यांनी आभारप्रदर्शन केले. दिवाळीपूर्वीच गोडधोड आणि औषधोपचारासाठी उपयुवत वस्तू लाभल्याने येथील रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद झळकल्याचे पाहायला मिळाले. यानंतर त्याच सभागृहात युथ कौन्सिल नेरुळ यांची वार्षिक सर्वसाधारण सभाही पार पडली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री आर एस नाईक, रमेश सुर्वे, अशोक महाजन, निशांत बनकर, विक्रम राम, सुरजितसिंह उभी, निशांत बनकर, दत्ताराम आंब्रे, एस.बी. सिंग, नरेश विचारे, सुनिल आचरेकर, दीपक दिघे, विकास साठे, रणजित दिक्षित, अजय माढेकर आदिंनी परिश्रम घेतले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिकेची ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' मोहीम