दिव्यांगांनी निर्मिलेल्या दिवाळी साहित्य प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' अभियानाला दिव्यांग कल्याणाची जोड

नवी मुंबई : वाशी येथील ‘नवी मुंबई महापालिका इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण आणि सुविधा केंद्र' विविध प्रकारच्या दिव्यांगाच्या सक्षमीकरणासाठी काम करणारे देशातील सर्वोत्तम केंद्र म्हणून नावाजले जात आहे. दिव्यांग कल्याणकारी अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून इटीसी केंद्राने नेहमीच दिव्यांगाना आधार दिलेला आहे.

या अनुषंगाने इटीसी केंद्राच्या माध्यमातून आयकॉनिक इमारत म्हणून नावाजल्या जाणाऱ्या बेलापूर येथील नवी मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीत आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग विद्यार्थी, व्यक्ती आणि त्यांचे पालक यांनी बनविलेल्या विविध दिवाळी साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन' मार्फत दिवाळी उत्सवाच्या कालावधीत ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' मोहीम राबविण्याचे सूचित करण्यात आले असून, महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग तर्फे इतर विभागांच्या सहयोगातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देणारा तसेच ‘थ्री आर'च्या अनुषंगाने टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्मितीला प्राधान्य देणारा दिव्यांगामार्फत दिवे, आकाश कंदील आणि इतर दिवाळी साहित्य निर्मितीचा अभिनव उपक्रम अत्यंत आगळावेगळा आहे.

या वस्तूंच्या महापालिका मुख्यालयातील प्रदर्शनास महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी भेट देत उत्तम कलाकृती निर्मितीबद्दल दिव्यांग मुलांचे, व्यक्तींचे तसेच त्यांच्या पालकांचे कौतुक केले. याप्रसंगी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता संजय देसाई, उपआयुक्त (प्रशासन विभाग) शरद पवार, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन विभाग) डॉ. बाबासाहेब राजळे, ईटीसी केंद्र संचालक उपआयुक्त ललिता बाबर आणि इतर विभागप्रमुख- अधिकारी उपस्थित होते.

या दोन दिवसीय दिव्यांग आणि त्यांच्या पालकांनी निर्माण केलेल्या दिवाळी वस्तू प्रदर्शनाला महापालिका अधिकारी-कर्मचारी आणि महापालिका मुख्यालयात येणाऱ्या अभ्यागतांनी भेट देऊन वस्तू खरेदी करुन त्यांचा उत्साह वाढविला. ‘स्वच्छ भारत मिशन' अंतर्गत ‘थ्री आर'च्या अनुषंगाने ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी' मोहीमेतही एका चांगल्या दिव्यांग कल्याणकारी उपक्रमाची नोंद झाली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 कांदा दरात १५ रुपयांनी घसरण