कांदा दरात १५ रुपयांनी घसरण

दिवाळी सणाच्या तोंडावर ग्राहकांना दिलासा

वाशी : मागील १५ ते २० दिवसांपासून घाऊक बाजारात ५५ पार ते किरकोळ बाजारात प्रतिकिलो ८० रुपयांवर कांद्याचे दर गेले होते. त्यामुळे या कडकलेल्या कांदा दराने ग्राहकांना रडवण्यास सुरुवात केली होती. मात्र, ६ नोव्हेंबर रोजी बाजारात अचानक कांदा दरात १५ ते २० रुपयांची घसरण झाल्याने दिवाळी सणाच्या तोंडावर ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात लहरी हवामानामुळे कांदा उत्पादनाला फटका बसला होता. त्यामुळे बाजारातील आवक घटल्याने कांदा दरात सातत्याने वाढ होत चालली होती. मागील आठवड्यात घाऊक बाजारात कांदा दराने प्रतिकिलो ५५ रुपये पार केले होते. तर किरकोळ बाजारात ७० ते ८० रुपये प्रतिकिलो दरावर कांदा गेला होता. दोन अडीच महिन्यांपूर्वी टॉमेटो दराने देखील उसळी घेत २०० रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यावर केंद्र सरकारने टॉमेटो दर नियंत्रणात आणण्यासाठी नेपाळ मधून टॉमेटो आयात केला होता. त्यानंतर टॉमेटो दर घसरण्यास सुरुवात झाली. तर आता देखील कांद्याचे दर वाढलेले पाहता केंद्र सरकार टॉमेटो प्रमाणे कांदा देखील आयात करु शकतो, अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे साठवणुकीतील कांदा बाहेर काढण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कांद्याला चांगला भाव भेटत असल्याने गुजरात मधून देखील कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात घसरण झाली आहे, अशी माहिती एपीएमसी बाजारातील कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.

६ नोव्हेंबर रोजी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बाजारात १०२ गाड्या कांदा आवक झाली असून, कांदा २५ ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विकला गेला. तेच कांदा दर मागील आठवड्यात ४० ते ५५ रुपये प्रतिकिलो होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जलशक्ती अभियानाच्या कामांची केंद्रीय पथकाने केली पाहणी