‘नोटा'द्वारे वाढत्या प्रदूषणाचा रोष

कोपरी गाव सेक्टर-२६ मधील रहिवाशांचा निर्धार

वाशी : कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६ परिसरातील वाढत्या प्रदूषणामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदुषण विरोधात कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६ मधील रहिवाशी मागील वर्षापासून एकाकी लढा देत आहेत. मात्र, रहिवाशांच्या या लढ्याला कुठल्याच पक्षाचे लोकप्रतिनीधी साथ देत नसल्याने आगामी सर्व निवडणुकीत नोटा पर्याय निवडून प्रदूषणाविरोधात रोष व्यक्त करण्याचा निर्णय कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६ मधील रहिवाशांनी घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे येथील प्रस्थापितांना चांगलाच धक्का बसून राजकीय गणिते बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६ परिसरातील वाढत्या प्रदूषण विरोधात अनेक तक्रारी केल्यानंतर येथील रहिवाशांनी ‘स्वच्छ हवा, माझा अधिकार', या शिषकांतर्गत लढा उभारला आहे. या लढ्यात दर रविवारी येथील रहिवासी वाशी सेक्टर-२६ येथील चिंतामणी चौक येथे एकत्र जमून ठिय्या आंदोलन करतात. ५ नोव्हेंबर रोजी पाचवे आंदोलन होते. यावेळी रहिवाशांनी दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण तसेच प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना अद्याप होत नसल्याबाबत निषेध व्यक्त केला. या आंदोलनात कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६ मधील नागरिकांनी त्यांच्या सहा मागण्या प्रशासन आणि सरकार समोर ठेवल्या असून, त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात, अशी त्यांची मागणी आहे.
दरम्यान, कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६ मधील वाढत्या प्रदूषणाविरोधात जबाबदार लोकप्रतिनीधींकडून आवाज उठवला जात नसल्याने येथील रहिवाशी एकाकी झुंज देत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात निवडणुकीमध्ये प्रदूषणाबाबत शासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे ‘नोटा'ला मतदान करण्याचा निर्धार आता रहिवाशांनी केला आहे.
-------------------------------
नवी मुंबई महापालिका प्रशासन स्वच्छता सर्वेक्षण मध्ये देशात तिसरा क्रमांक मिळाला म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत असताना नवी मुंबई शहरातील नागरिकांना अशुध्द हवेचा सामना करावा लागतोय यासाठी गप्प का?. त्यामुळे लवकरात लवकर वायू प्रदूषणाचा प्रश्न सोडवला नाही तर भविष्यकाळात सरकार आणि प्रशासन विरोधात भव्य मोर्चा काढून लढा देण्यात येणार आहे. - संकेत डोके, अध्यक्ष - नवी मुंबई विकास अधिष्ठान.
----------------------------------------
कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६ मधील रहिवाशांच्या प्रमुख मागण्या
- नागरी वस्तीला अनुसरुन बफर झोन निर्धारित करण्यात यावा.
- बफर झोन मध्ये येणाऱ्या एमआयडीसी मधील केमिकल कंपन्यांना इतरत्र स्थलांतरित करावे.
- तुर्भे एपीएमसी परिसरात प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर कायमस्वरुपी धुळ क्षमण यंत्र बसवावे.
- रेल्वे रुळाशेजारील रहिवाशी इमारती जवळ सुरु असलेल्या दगडी खडी साठविण्याचे काम इतरत्र ठिकाणी रहिवासी इमारती पासून लांब स्थलांतरित करण्यात यावे.
- कोपरी गांव आणि कोपरखैरणे सेक्टर-११ शेजारील नाला पक्के बांधकाम करुन कायमस्वरुपी बंदिस्त करण्यात यावा.
- वाशी सेक्टर २६, २८ कोपरी गांव आणि कोपरखैरणे सेक्टर-११ परिसराला प्रदूषण नियंत्रण करण्याच्या बाबतीत अतिदक्षता परिसर म्हणून घोषित करण्यात यावे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 दिव्यांगांनी निर्मिलेल्या दिवाळी साहित्य प्रदर्शनाला उत्स्फुर्त प्रतिसाद