जलशक्ती अभियान अंतर्गत  ठाणे जिल्ह्याचे काम उत्तम

ठाणे जिल्ह्यातील जलसंधारण कामांची पाहणी, ‘जलशक्ती अभियान'च्या कामांचा घेतला आढावा

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील सर्व विभागांनी जलशक्ती अभियान अंतर्गत उत्तम काम केले असून यापुढेही असेच काम सुरु ठेवावे, असे प्रशंसोद्‌गार ‘राष्ट्रीय नीती आयोग'च्या सदस्या जागृती सिंघला यांनी ठाणे येथे काढले.

केंद्र शासन पुरस्कृत जलशक्ती अभियान सन २०२२-२३ कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांची पाहणी करण्याकरिता तसेच ‘जलशक्ती अभियान-राष्ट्रीय जल मिशन'च्या कामांचा आढावा घेण्यासाठी जागृती सिंघला यांनी ठाणे जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी सिंघला यांचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जागृती सिंघला यांच्यासह उपस्थित असलेल्या ‘केंद्रीय भूजल बोर्ड'च्या शास्त्रज्ञ तथा तांत्रिक अधिकारी वैष्णवी परिहार यांचे ‘ठाणे जिल्हा परिषद'चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ‘जिल्हा परिषद'च्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी दीपक चव्हाण  यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यामध्ये जलशक्ती या अभियानांतर्गत सर्व विभागांनी चांगले काम केल्याचे दिसून आले आहे. यापुढेही सदर काम अधिक विस्ताराने अधिकाधिक चांगल्या प्रकारे कसे करता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असे सिंघला म्हणाल्या.

बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी शिनगारे यांनी जिल्ह्यात झालेल्या जलसंधारण कामांची संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती सादर केली. याचबरोबर त्यांनी जिल्ह्याची लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, वृक्ष लागवड, सिंचन विहिरी, अमृत सरोवर योजना मार्फत करण्यात आलेली कामे याविषयीची देखील माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल यांनी या अभियान संदर्भात करण्यात आलेल्या जनजागृती कार्यक्रमांबाबत माहिती दिली.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे यांनी जिल्ह्यातील कृषी विषयक कामे आणि नियोजनाची माहिती दिली. तर उपजिल्हाधिकारी दिपक चव्हाण यांनी जिल्ह्यात मनरेगा योजना अंतर्गत सुरु असलेल्या विविध कामांविषयीची माहिती दिली. तसेच शेवटी उपस्थित सर्वांचे आभारही मानले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पोटभाडेकरु बसवून ‘मार्जिनल स्पेस'चा वापर