कृष्णाळे तलावात कचराच कचरा!

महापालिका आयुवतांनी कचऱ्याची समस्या दूर करण्याची मागणी

नवीन पनवेल : पनवेल शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग गेल्या कित्येक दिवसांपासून साचलेले दिसून येत आहेत. तर शहराच्या मध्यवर्ती असणाऱ्या कृष्णाळे तलावात मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने दुर्गंधी सुटली आहे. पनवेल महापालिका हद्दीतील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कचरा उचलणाऱ्या जुन्या ठेकेदाराचा कंत्राट संपल्यामुळे नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. वाढत्या कचऱ्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. पनवेल शहरात पाच तलाव आहेत. यातील वडाळे तलाव, लेंडाळे  आणि देवाळे तलाव यांची स्थिती चांगली आहे. मात्र, इस्त्रायली तलाव आणि कृष्णाळे तलावाची स्थिती चांगली नाही. इस्त्रायली तलावात पर्णवेळी, कचरा साचला असून या तलावात भांडी, कपडे धुतले जातात. तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि बाजाराच्या ठिकाणी असलेल्या कृष्णाळे तलावात मोठ्या प्रमाणात हार, फुले, दारुच्या बाटल्या, नारळाच्या
करवंट्या, गजरे, कचरा, विविध प्रकारचा कचरा टाकण्यात आलेला आहे. तलावाच्या बाजुलाच गजरा तयार करणारे आणि मार्केट असल्याने थेट कचरा तलावात टाकला जात आहेे. सदरचा कचरा गेले कित्येक दिवस तलावातून बाहेर काढलेला नसल्याने तो कुजल्याने त्याला दुर्गंधी सुटली आहे. कृष्णाळे तलावात मोठ्या प्रमाणात कचरा पसरलेला असल्याने सकाळच्या वेळेला मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना येथील दुर्गंधीचा सामना करावा लागतो. कर भरुन देखील महापालिका कचरा उचलण्याबाबत सक्षम नसेल तर कर कशासाठी
भरायचा? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, पनवेल महापालिका हद्दीत कचऱ्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. महापालिका आयुक्तांनी पालिका हद्दीत फेरफटका मारावा आणि कचऱ्यासारखी गंभीर समस्या हाताळून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

जलशक्ती अभियान अंतर्गत  ठाणे जिल्ह्याचे काम उत्तम