घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई होणार अधिक सक्षम

महापालिका मार्फत पर्यावरणपूरक गॅस, विद्युत निर्मिती प्रकल्प राबविण्याची चाचपणी

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने तुर्भे एमआयडीसी परिसरात शास्त्रोक्त भूभरणा पध्दतीवर आधारित अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित असून तो पर्यावरणपूरक प्रकल्प म्हणून राष्ट्रीय पातळीवर नावाजला जात आहे.

सन २००४ पर्यंत सुरुवातीच्या काळात कोपरखैरणे, सेक्टर-१४ येथील ‘सिडको'च्या क्षेपणभूमीवर कचरा टाकला जात होता. तेव्हा नागरिकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत होत्या. तसेच विविध स्तरांतून या क्षेपणभूमीला विरोध केला जात होता. या गोष्टीची गांभीर्याने नोंद घेत नवी मुंबई महापालिकेने पर्यायी जागा शोधण्यास सुरुवात केली आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तुर्भे एमआयडीसी क्षेत्रात प्राप्त झालेल्या ३६ एकर जागेमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमावली २००४ नुसार शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सन २००४ मध्ये कार्यान्वित करण्यात आला.

जेएनएनयुआरएम अंतर्गत क्षेपणभूमी मध्ये प्रतीदिन ३५० मेट्रीक टन क्षमतेचा खत प्रकल्प आणि औद्योगिक इंधन अर्थात आरडीएफ निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात आला. घनकचरा व्यवस्थापन नियमावली २०१६ लागू झाल्यानंतर यामध्ये अनुषांगिक बदल करण्यात येऊन या प्रकल्पाची क्षमता वाढविण्यात आली.

तुर्भे एमआयडीसी येथे सदर आधुनिक शास्त्रोक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विकसीत करताना जुनी कोपरखैरणे येथील क्षेपणभूमीही शास्त्रोक्त पध्दतीने बंद करण्याची कार्यवाही अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली. यानंतर सदर जागेवर मोठ्या प्रमाणात हिरवळीची लागवड करीत निसर्गोद्यान विकसीत करण्यात आले. आज या ठिकाणी सकाळी आणी संध्याकाळी जॉगींगसाठी तसेच विरंगुळ्यासाठी ७ ते ८ हजारहुन अधिक आबालवृध्द नागरिक दररोज येत असतात. तसेच निसर्गोद्यानाच्या कडेने या विस्तृत जागेवर ६५ हजार देशी वृक्षरोपांची लागवड करुन मियावाकी पध्दतीचे शहरी जंगल विकसित करण्यात आलेले आहे.

अशाप्रकारे कोणत्याही प्रकल्पामध्ये आणि कामामध्ये पर्यावरणशीलता जपण्याकडे विशेष लक्ष दिले जात असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तुर्भे एमआयडीसी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अधिक अद्ययावत आणि आधुनिक तंत्रयुगाला साजेसा बनविण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.

सध्या काही मोठी शहरे शासन धोरणानुसार ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्मिती आणि विद्युत निर्मिती प्रकल्प राबविण्याची कार्यवाही करताना दिसत आहेत. केंद्र सरकारनेही देशातील तेल कंपन्यांच्या सीएसआर निधीमधून कचऱ्यापासून गॅस आणि विद्युत निर्मिती करणाऱ्या पर्यावरणशील प्रकल्प उभारणीवर भर देत तशा प्रकारचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार बीपीसीएल, इंडीयन ऑईल, ओएनजीसी, गेल अशा कंपन्यांच्या सीएसआर निधीमधून काही शहरांमध्ये कचऱ्यापासून गॅस आणि विद्युत निमिती प्रकल्प राबविण्यास सुरुवात झालेली आहे.

घनकचरा व्यवस्थापनात नेहमीच वेगवेगळ्या स्वरुपाचे अत्याधुनिक प्रयोग करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने देखील याविषयी सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे. या अनुषंगाने नवी मुंबईत कचऱ्यापासून गॅस निर्मिती आणि विद्युत निर्मिती प्रकल्प राबविण्यास ओेएनजीसी सारखा मान्यताप्राप्त उद्योगसमुह उत्सुक असून त्यादृष्टीने महापालिका सर्वांगीण विचार करुन चाचपणी करीत आहे. सदर प्रकल्प कार्यान्वित झाल्यास नवी मुंबई महापालिका घनकचरा व्यवस्थापनात अधिक सक्षम होणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सानपाडा येथील उद्यानातील खेळणी, बाकांची दुरवस्था