रस्ता अडवून टेम्पोमध्ये कांदा-बटाटा विक्री
एपीएमसी भाजी मार्केट समोरील प्रकार
तुर्भेः एपीएमसी मधील भाजीपाला मार्केट समोरचा अत्यंत वर्दळीचा रस्ता अडवून बेकायदेशीररित्या टेम्पोमध्ये कांदा बटाट्याची विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, १० ते १५ सुरक्षा रक्षक यांच्या संरक्षणामध्ये दिवसभर सदर मंडळी व्यवसाय करत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामुळे येथील वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असताना महापालिका आणि हाकेच्या अंतरावर असलेले वाहतूक पोलीस मूग गिळून गप्प बसलेले दिसतात. यामध्ये संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे काही आर्थिक हितसंबंध तर नाही ना? अशी चर्चा येथील जनतेमध्ये आहे.
तुर्भे विभाग कार्यालय अंतर्गत भाजी मार्केटच्या विरुध्द बाजुकडील रस्ता ते धान्य मार्केटच्या आवक गेटपर्यंत २० ते २५ कांदे-बटाटे विक्रेते चक्क रस्त्याची १ लेन (मार्गिका) हडप करुन टेम्पोमध्ये मालाची विक्री करत आहेत. विशेष म्हणजे सदर ठिकाणी सकाळी ९ वाजल्यापासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, १० ते १५ सुरक्षा रक्षक यांच्या तापयासह हजर असतात. तरीही रस्ता अडवणारे टेम्पोवाले आणि फळ मार्केट जावक गेट ते माथाडी भवन पर्यंतचे फेरीवाले हटत नाहीत. तसेच सकाळी ९.१५ च्या ठोक्याला वाहतूक पोलीस कर्मचारी टोईंग व्हॅन मधून नो-पार्किंगच्या गाड्या काढा घोषणा देत या रस्त्यावरुन जातात. अनेकदा टोईंग व्हॅन देखील या बेकायदेशीरपणे लागलेल्या टेंपोमुळे वाहतूक कोंडीत अडकत असताना देखील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या घटकांवर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे महापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या संरक्षणामध्ये दिवसभर सदर मंडळी बेकायदेशीरपणे व्यवसाय करत असल्याचे चित्र या परिसरात आहे.
वाशी-तुर्भे लिंक रोडवर मयुरेश हॉस्पिटलच्या लगत असलेल्या महापालिकेच्या सर्व्हिस रोडवर २० ते २५ कांदे-बटाटे विक्रेते ठाण मांडून आहेत. तसेच एपीएमसी सिग्नल ते भाजीपाला मार्केट जावक गेट, याच जावक गेटच्या विरुध्द बाजुचा सर्व्हिस रोड, एपीएमसी सिग्नल ते कांदा बटाटा मार्केट आवक गेट, एपीएमसी वाहतूक पोलीस चौकी ते मसाला मार्केटला जाणाऱ्या नाल्यावरील पादचारी पुल, माथाडी भवन ते जलाराम मार्केट चौक, सानपाडा हायवे सिग्नल ते एपीएमसी सिग्नल येथील पदपथ आणि रस्ता यावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केट मध्ये येणारे कामगार, खरेदीदार आदि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरुन रस्त्यावरुन चालावे लागत आहे. परिणामी, अनेकदा किरकोळ आणि गंभीर स्वरुपाचे अपघात होत आहेत.