ॲक्शन मोडमध्ये प्रदुषण नियंत्रण मंडळ
ठाणे मध्ये १२५ डेसिबल क्षमतेपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांवर बंदी
ठाणे : दिवाळी उंबरठ्यावर आलेली आहे. त्यात फटाक्यांच्या दुकानेही सजलेली आहेत. लहानसहान फटाके ते धमाका करणाऱ्या फटाक्यांचा साठा बाजारात विक्रीस सुरु झालेला असतानाच ठाणे येथे रायलादेवी तलाव परिसरात ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'च्या वतीने १ नोव्हेंबर रोजी फटाक्यांच्या डेसिबलची चाचपणी करण्यात आली. १२५ डेसिबल पेक्षा अधिक आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घालण्यात येणार असून तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'चे सब रिजनल ऑफिसर अनंत कटोले यांनी दिली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर रोजी रायलादेवी तलाव परिसरात ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ'ने फटाक्यांच्या आवाजाची चाचणी केली. पूर्वीच ठाणेमध्ये वातावरणात धुलीकरणाचे स्तोम माजलेले असतानाच आता दिवाळीत फटाक्याच्या आतषबाजीने वातावरणातील प्रदुर्षणासोबतच ध्वनी प्रदुर्षण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'ने फटाक्यांच्या आवाजाची चाचणी करुन १२५ डेसिबल आवाजाची मर्यादा ठाण्यात निर्धारित केली.
शासनाकडे प्रस्ताव पाठविणार...मर्यादा ओलांडल्यास कारवाई
ठाणे येथे फटाक्याच्या आवाजाच्या घेतलेल्या चाचणीत ‘प्रदुषण नियंत्रण मंडळ'तर्फे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या चाचणीत मंडळाने विविध फटाक्यांच्या आतषबाजी नंतरच्या आवाजाच्या डेसिबलची मोजणी यंत्राद्वारे केली. ठाणे येथे १२५ डेसिबलच्या क्षमतेच्या फटाक्यांना परवानगी असून १२५ क्षमतेपेक्षा जास्त आवाजाची फटाक्यांची आतषबाजी केल्यास किंवा दुकानदाराकडे आढळल्यास ‘महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ' कठोर कारवाई करेल, असा इशारा ‘मंडळ'चे सब रिजनल ऑफिसर अनंत कटोल यांनी दिला आहे.