पार्किंग समस्या, वाहतूक कोंडीमुळे ‘ठाणे'करांची गैरसोय

कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी कृष्णा पाटील यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना साकडे

ठाणे : ठाणे शहरातील पार्किंग आणि वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने अभ्यास करुन त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी ‘मुंबई आयआयटी'च्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी ‘भाजपा'चे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर मागणीचे पत्र दिले आहे. मुंबई लगतचे वाढते शहर म्हणून ठाणे झपाट्याने विकसित होत आहे. या वाढत्या शहरात मागील १५ वर्षात मोठी गृहसंकुले झाली, लोक राहण्यास आले. त्यांची चारचाकी, दुचाकी वाहनांमध्ये वाढ झाली. परिणामी, ठाणे मध्ये ट्रॅफिक आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यातच प्रत्येक वर्षी वाहन खरेदी वाढलेली आहे. त्यामुळे ठाणे शहर आणि महापालिका हद्दीत अनेक भागात वाहतूक कोंडी आणि पार्किंग समस्येमुळे नागरिकांना गैरसोयी होत आहेत, असे कृष्णापाटील यांनी सदर पत्रात नमूद केले आहे.

ठाणेकर पादचाऱ्यांची घुसमट होत आहे. यावर कायमस्वरुपी आणि दूरचा विचार करुन तोडगा काढणे आवश्यक आहे.  ठाणे मधील ट्रॅफिक आणि पार्किंग समस्या सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने ‘मुंबई आयआयटी'च्या माध्यमातून सर्वेक्षण करावे. ‘आयआयटी'द्वारे सर्वेक्षण करुन सदर समस्येवर तोडगा सूचवावा. यासाठी राज्य शासनाने आयआयटी समवेत एक कमिटी नियुक्त करावी, अशी मागणी कृष्णा पाटील यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

१५ वर्षात रस्ते तेवढेच; वाहनांमध्ये तीनपट वाढ...
ठाणे शहराच्या भागातून अनेक राज्यमार्ग जातात. त्यामुळे वाहनांची वर्दळ असते. दरम्यान ठाणे मध्ये अनेक उड्डाणपुल झाले. मात्र, वाहतूक कोंडी काही सुटेना; तर दुसरीकडे शहराच्या अंतर्गत भागात रस्ते रुंदीकरणासाठी मुबलक जागा नाही. त्यामुळे अनेक वर्षापासून रस्ते तेवढेच राहिलेले आहेत, तर रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या मात्र तीनपट वाढलेली आहे. दुसरीकडे ठाणे महापालिकेने पार्किंग धोरण अवलंबिले नसल्याने शहरात येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न पडतो. त्यामुळे रस्त्यावर पार्किंग करण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी, पूर्वीच अरुंद असलेल्या रस्त्यावर पार्किंग मुळे वाहतुकीसाठी आणखीन अरुंद होतात. अन्‌ वाहतूक कोंडी उद्‌भवते. म्हणून पार्किंग आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे.

ठाणे येथे वाढती लोकसंख्या, वाहन संख्या आणि अपुरे रस्ते लक्षात घेऊन वाहतूककोंडी आणि पार्किंग यावर कायमस्वरुपी तोडगा काढणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘आयआयटी'च्या माध्यमातून सर्वेक्षण व्हावे, अशी मागणी केली आहे. -कृष्णा पाटील, माजी नगरसेवक-भाजपा. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राज्यात शांतता, कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन